पालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला वेठीस धरता? प्रायव्हेट शाळांचे शिक्षक वैतागले आणि…

पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या(BMC Election) अनुषंगाने आयोगाकडून निवडणुकीची कामे वेगाने करण्यावर भर दिला आहे. या कामासाठी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना डयुटी लावल्या आहेत. २०१९ पासून दिवाळी सुट्टी, कोविड काळात शिक्षकांनी मतदारसंघातील कामे पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्याऐवजी अपूर्ण कामे असलेल्या मतदारसंघात पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी सर्व ठिकाणी आम्हीच का? महापालिकेची निवडणूक आहे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना घ्या, अशी भूमिका घेत बदलीच्या ठिकाणी न जाण्याची भूमिका घेतली आहे.

    मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या(BMC Election) अनुषंगाने आयोगाकडून निवडणुकीची कामे वेगाने करण्यावर भर दिला आहे. या कामासाठी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना डयुटी लावल्या आहेत. २०१९ पासून दिवाळी सुट्टी, कोविड काळात शिक्षकांनी मतदारसंघातील कामे पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्याऐवजी अपूर्ण कामे असलेल्या मतदारसंघात पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी सर्व ठिकाणी आम्हीच का? महापालिकेची निवडणूक आहे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना घ्या, अशी भूमिका घेत बदलीच्या ठिकाणी न जाण्याची भूमिका घेतली आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत आहेत. मात्र शिक्षक शाळेतील कामाऐवजी निवडणूक कामातच अधिक असणार आहेत. मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना २०१९ पासून बीएलओ पदावर नियुक्ती करून निवडणूक कामाला लावले. रजा, प्रवास भत्ता अशा कोणत्याही सुविधा नसताना दिवाळी, उन्हाळी सुट्टी, कोविड काळातही मतदारसंघातील कामे पूर्ण केली. नियुक्त मतदारसंघातील काम पूर्ण झाल्यावर आता पुन्हा शाळेत पाठवणार असे शिक्षकांना वाटत असतानाच जिल्हा अधिकाऱ्यांनी अपूर्ण कामे असलेल्या मतदारसंघात त्यांची बदली केली.

    कामे पूर्ण झालेल्या बोरिवली व अंधेरी पूर्व मतदारसंघातून नुकतेच १०० शिक्षकांचे वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम मतदारसंघात बदली करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेची निवडणूक आहे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना घ्या, त्यासाठी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकच का? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

    मतदारसंघातील काम पूर्ण झाले असेल तर त्यांना शाळेत पुन्हा पाठवण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. निवडणुकीच्या कामावर असलेले काही शिक्षक रिक्त जागेवर शाळेत जाण्यासाठी तयार असूनही दोन वर्षांपासून त्यांची सुटका होत नाही. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अन्यायकारक भूमिकेबाबत पोलिसांकडे बाजू मांडण्यासाठी गेलेल्या शिक्षकांचीच उलटपक्षी चौकशी केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांची ही मनमानी असून उर्वरित मतदारसंघातील कामे पूर्ण झाली नसतील तर तेथे शिक्षकांची नियुक्ती करणे चुकीचे आहे. दोन वर्षे सतत राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांवर जबरदस्ती करू नये. ज्यांना शाळेत जायचे आहे त्यांना जाऊ द्या अशी मागणी शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली. दरम्यान या शिक्षकांनी हे आदेश स्विकारले नसून बदली ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.