मविआत स्थानिक पातळीवर मने जुळणार का?; ऐरोली विधानसभेत सेनेचे पारडे जड

जिंतेंद्र आव्हाडांनी ऐरोली येथील मेळाव्यात सूचना करताच नवी मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबतत एकमत झाले असले तरी काँग्रेस काहीशी तळ्यातमळ्यात दिसत आहे. तर दुसरीकडे मविआसाठी निवडणुकांसाठी वातावरण चांगले असले तरी, पॅनल पद्धत असल्याने तिन्ही पक्षांची मदत मविआला विजय मिळवून देणार आहे. मात्र प्रत्येक पक्षाचा इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने; स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.   

    सिद्धेश प्रधान नवी मुंबई – सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा महोत्सव राज्यभरात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सध्यातरी त्यात ओबीसी आरक्षणाने खोळंबा घातला आहे. सुप्रीम कोर्टाने खुल्या गटात ओबीसी वर्गाला स्थान देत निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे  निवडणुका ओबीसी राजकीय अरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. या गोंधळात स्थानिक पातळीवर देखील संभ्रम असला तरी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

    जिंतेंद्र आव्हाडांनी ऐरोली येथील मेळाव्यात सूचना करताच नवी मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबतत एकमत झाले असले तरी काँग्रेस काहीशी तळ्यातमळ्यात दिसत आहे. तर दुसरीकडे मविआसाठी निवडणुकांसाठी वातावरण चांगले असले तरी, पॅनल पद्धत असल्याने तिन्ही पक्षांची मदत मविआला विजय मिळवून देणार आहे. मात्र प्रत्येक पक्षाचा इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने; स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

    कधी नव्हे ते देशात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी अस्तित्वात आली या नव्या प्रयोगात नेत्यांना स्वतःच्या आमदारांना देखील एकमेकांविरोधात सांभाळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे आयुष्यभर आपले प्रभाग व विभाग पिंजून काढून पक्षाची ताकद तयार केलेल्या कार्यकर्त्यांसमोर आघाडीतून लढण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे.

    आघाडी होणार हे निश्चित असले तरी; कार्यकर्त्यांसमोर मात्र आपल्या प्रभागातुम ज्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्यांच्यासाठी प्रचार करावा  लागणार आहे. कित्येकवर्ष स्वतःच्या पक्षाची निशाणी अभिमानाने मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आव्हान ससमोर असणार आहे.

    त्यात मित्र पक्षाचा उमेदवार हरल्यास पुन्हा एकमेकांवर कामे न केल्याचे आरोप प्रत्यारोप सहन करावे लागणार असून; हे वाद नेत्यांना सोडवावे लागणार आहेत. हीच भीती ज्यांना।उमेदवारी मिळाली आहे अशा उमेदवारांना देखील सतावणार आहे. विजय तर दूरच; मात्र मित्र पक्षातील इच्छुक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांना आपलेसे करावे लागणार आहे. आजपर्यंत असलेले हेवेदावे दूर करून आपला प्रचार करावा यासाठी मान अपमान बाजूला ठेवून हात जोडावे लागणार आहेत.

    पॅनल पद्धत असल्याने मविआला आघाडी होऊनही हे आव्हान ओलांडून मग निवडणूक विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासोबत आपल्या मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपामधून येणाऱ्या ऑफरवर देखील लक्ष ठेवावे लागणार असून; यातून आघाडीला वातावरण पोषक असूनही मविआतील उमेदवाराला मित्र।पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी घोडेबाजाराला उत येणार आहे.

    भाजपाची नजर मविआच्या बिघाडीवर?

    भाजपाकडून सध्या मविआच्या इच्छुकांवर  व कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यात खगी एजन्सी नेमून केलेल्या सर्वेवर कोणाचे नाव आघाडीवर आहे. त्यावर देखील भाजपा लक्ष ठेवून आहे. त्यातून ज्या प्रभागात मविआच्या तगड्या इच्छुकांना संधी मिळणार नसल्याचे हेरत अशांशी भाजपाकडून संपर्क देखील साधले गेले असल्याची चर्चा आहे. येत्या काळात मविआच्या नेत्यांकडून भाजपाचे अनेकजण संपर्कात असल्याचे दावे केले जात असले तरी तसाच फटका आ. गणेश नाईकांकडून मविआला बसण्याची शक्यता आहे. निवडणूका जवळ आल्यावर सर्व पक्षीयांमधील निष्ठावंतांची खरी निष्ठा बघण्यास मिळणार आहे.

    ऐरोली विधानसभेत शिवसेनेचे पारडे जड

    पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने ऐरोली विधानसभेत शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे. विजय चौगुले गट, नवीन गवते गट, एम के मढवी गट, शिवराम पाटील गटाचे पॅनल निवडून।येण्याची शक्यता आहे. त्यात दिघा व ऐरोलीत वाढीव प्रभाग तयार केल्याचा आरोप माजी आ. संदीप नाईक यांनी केला आहे. जर तसे घडल्यास सेनेची मोहोर ऐरोली विधानसभेवर उमटण्याची शक्यता आहे. कुलकर्णी गटामुळे देखील सेनेचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या पोषक वातावरणात राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सेनेला मिळणे गरजेचे आहे.

    भविष्यात आघाडीत बिघाडी झाल्यास काय?

    मविआतून निवडणूक लढवताना उमेदवारी न मिळाल्यास काय ? असा प्रश्न देखील प्रत्येकाला सतावत आहे. आयुष्यभर पक्ष वाढवण्यासाठी केलेली मेहनत, आयुष्यभर प्रभागात प्रतिस्पर्धी म्हणून पाहत आलेल्या, मित्र पक्षातील प्रतिस्पर्ध्याला निवडून आणणे प्रत्येकाच्या राजकोय कारकिर्दीसाठी आत्मघातकी ठरणार  आहे. भविष्यात पुढील विधानसभेला आघाडीची बिघाडी झाल्यास काय करायचे? याची चिंता देखील सतावत आहे.

    त्यामुळे केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता असून; प्रभाग गमावण्याची शक्यता आहे. त्यात प्रामाणिकपणे निवडून आणल्यावर मित्र पक्षातील विजयी उमेदवार हे एखाद्या नागरी कामाचे श्रेय आपल्याला मिळवून देईल का असे असंख्य प्रश्न डोक्यात घेऊन यंदाची निवडणूक मविआच्या कार्यकर्त्यांना लढवावी लागणार आहे.  त्यामुळे कागदावर जरी आकडेवारीनुसार समीकरण सोपे असले तरी प्रत्यक्षात मात्र ते कठीण दिसत आहे.