vijay kamble

ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे(Vijay Kamble Passed Away) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

    मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे(Vijay Kamble Passed Away) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात(Lilavati Hospital) उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी दुपारी त्यांच्यावर दादर (Dadar)येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहिली.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल जागेची मागणी करण्यासाठीही ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी समुद्रात एक मुठ माती टाकण्याचे आंदोलनही केले. हे त्यांचे आंदोलन संस्मरणीय ठरले. श्रमिक उत्कर्ष सभेचे ते सरचिटणीस होते. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी त्यांच्या युनियनच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आणि कामगारांना न्याय मिळवून दिला. प्रथम त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करून श्रमिकांना न्याय देण्याचे काम केले. परंतु वैचारिक मतभेदामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. त्यानंतर त्यांनी कामगारांच्या न्यायासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी होऊन सभागृहात त्यांचे प्रश्न मांडून सोडविले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी २०१४ साली कुर्ला विधानसभेची भाजपच्या तिकीटांवर निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यात यश आले नाही.आपल्याला विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होता आले नाही, याचे शल्य त्यांना नेहमी बोचत राहिले. लोकप्रतिनिधी म्हणून मला मिरवायचे नाही. तर कामगारांच्या हितासाठी आयुधाचा वापर करून त्यांना न्याय मिळवून दयायचा आहे. असे ते नेहमी म्हणायचे.

    कोविड काळात कामगारांची होत असलेली दयनीय अवस्था पाहून आपले मन उदिग्न होत असल्याचे ते म्हणायचे. कामगारांच्या हितासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे राजकारणातील धुरंधर त्यांच्यापासून दुरावले होते. मात्र त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. त्यांनी आपला स्वाभिमान शेवटपर्यंल जपला हाेता.