वरळी, धारावी, भायखळा, दादर परिसर डेंग्यूचा हॉटस्पॉट; डेंग्यू, मलेरियाचा ताप वाढला

वरळी, धारावी, भायखळा आणि दादर परिसरात डेंग्यूचा हॉटस्पॉट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सापडलेल्या मुंबईतील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण या भागातील आहेत. दरम्यान, डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांचे अड्डे नष्ट करण्यासाठी वरळीमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे.

    मुंबई : वरळी, धारावी, भायखळा आणि दादर परिसरात डेंग्यूचा हॉटस्पॉट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सापडलेल्या मुंबईतील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण या भागातील आहेत. दरम्यान, डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांचे अड्डे नष्ट करण्यासाठी वरळीमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे.

    मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असताना आता डेंग्यू, मलेरियाचा ताप वाढतो आहे. दरवर्षी सप्टेंबरपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. यावेळी मात्र ऑगस्टपासून डेंग्यूने डोके वर काढले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत डेंग्यूचे १४४ रुग्ण आढळले होते. त्यापैकी बहुतांश रुग्ण वांद्रे, सँडहर्स्ट रोड आणि परळ भागातील होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ३०५ रुग्ण आढळले आहेत.

    त्यापैकी सर्वाधिक प्रादुर्भाव वरळी, भायखळा, दादर सारख्या निवासी भागात वाढला आहे. त्यामुळे या भागात पालिकेकडून विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत. अडगळीच्या जागेतील डेंगी आणि मलेरियाच्या अळ्या नष्ट करण्यासाठी पालिकेकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.