Would have stopped if there had been participation? Pradip Sharma's claim in court

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मोटेकरीला २८ जूनपर्यंत एनआयए न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात शर्मा यानी मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. संतोष हा माझा जुना खबरी आहे. पण निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मोटेकरीला २८ जूनपर्यंत एनआयए न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात शर्मा यानी मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. संतोष हा माझा जुना खबरी आहे. पण निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  एनआयएने पहाटेच छापे मारले

  प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरासहीत त्यांच्या कार्यालयावर एनआयएने पहाटेच छापे मारले होते. त्यानंतर शर्मा यांची पुन्हा चौकशी करून त्यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मिटकरीला एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले.तेथे तिघांनाही २८ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

  वाझे सोबत शर्मा यांचा गुन्ह्यात सहभाग

  यावेळी शर्मा यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, एनआयएने शर्मा यांचा यापूर्वीच जबाब नोंदवला होता. त्याच वेळी बँक डिटेल्स, सीडीआर हा देखील काढला होता. त्यात काही निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना सोडले होते, असा युक्तिवाद केला. तर सचिन वाझे याच्यासोबत शर्मा यांचा या गुन्ह्यात सहभाग होता. सतीष, मनीष, रियाज, संतोष आणि आनंद यांचाही या हत्या प्रकरणात सहभाग होता. सचिन वाझे आणि शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेन हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत, असा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

  सहभाग असता तर थांबलो असतो का?

  प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर मिळाली आहे. ज्याचा परवाना मुदत संपलेली आहे, असे तपासात आढळून आले आहे. शर्मा यानी मात्र १९९७ मध्ये रिव्हॉल्व्हर विकत घेतल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, माझा हत्या प्रकरणात सहभाग असता तर मी थांबलो असतो का? वाझेशी काहीही संबंध नसल्याचे सांगत मागच्यावेळी चौकशीला बोलावण्यात आले तेव्हा वाहिन्याकडून पाठलाग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  मी शिवसेनेचा आहे

  शर्मा म्हणाले की, अँटालिया आणि हिरेन प्रकरणात ज्या चौघांना पकडले आहे. त्यांना मी ओळखत नाही. त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही. संतोष हा माझा जुना खबरी आहे, असे सांगत मी शिवसेनेचा आहे, असेही त्यांनी न्यायालयाला भावूक होत सांगितले.

  शर्माच्या आदेशानेच मनसुख हिरेनची हत्या

  दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हेच मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष या आरोपींनी केल्याचे एनआयएच्या वकिलांनी सांगितले.

  प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क

  मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती. शर्मा यांच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी?, असा प्रश्न न्यायालयात उपस्थित करण्यात आला.

  हे सुद्धा वाचा