‘तुम एक पत्नी हो, तुम्हाला पती जैसा चाहेगा वैसाही होगा’…. मुंबई पोलिसांनी ट्विट करत महिला सुरक्षेविषयी दिला अनोखा संदेश

पोलिसांनी लोकांना वैयक्तीक जीवनात जोडप्यांमधील नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी, भांडण टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन केलं आहे. शब्द जपून वापरायला हवेत असाही संदेश पोलिसांनी यावेळी दिला आहे.

    सोशल मीडियाचा अचूक वापर करत अत्यंत समर्पकपणे सामाजिक संदेश देण्यासाठी मुंबई पोलीस कायमच चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून शहरात सातत्याने समोर आलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना जागरूक करण्यासाठी एका अनोख्या प्रकारचा संदेश दिला आहे.

    नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि नियमांची आठवण करून देण्यासाठी सोशल मीडियावरून संदेश देत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी शेरशाह चित्रपटातील अभिनेत्री कियारा अडवानी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील संवादाचा वापर करत महत्वाचा संदेश दिला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय इतर चित्रपटातील मागास दृष्टीकोन दर्शवत असले्ल्या डायलॉग्सचा वापर करत पोलिसांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आहे.

    या ट्विटच्या कॅप्शनमध्ये नमूद केलंय की,चित्रपट आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहेत. काही संवाद असे आहेत ज्यााचा आपला समाज आणि सिनेमा या दोन्हीदृष्टीनं गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे. बोलताना आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. कायदा हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत! या ट्विट करत असताना पोलिसांनी #LetsNotNormaliseMisogyny, #MindYourLanguage, #WomenSafety हे हॅशटॅग्स वापरले आहेत.

    अनेकदा चित्रपटातून बायकांविषयी चुकीचं मत पसरवलं जातं. उदा. ‘चुन्नी ठीक करो, तुम एक पत्नी हो, तुम्हाला पती जैसा चाहेगा वैसाही होगा’, अशा प्रकारचे डायलॉग्स महिलांवर बंधन घालण्याचा दृष्टीकोन दर्शवतात. यातूनच घरगुती हिंसाचार वाढू शकतो. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यास कायद्याचा हस्तक्षेप अटळ आहे.

    त्यामुळे पोलिसांनी लोकांना वैयक्तीक जीवनात जोडप्यांमधील नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी, भांडण टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन केलं आहे. शब्द जपून वापरायला हवेत असाही संदेश पोलिसांनी यावेळी दिला आहे. मुंबई पोलिसांनी ३० सप्टेंबरला सकाळी साडे दहाच्या दरम्यान हे ट्विट केलं. अत्यंत कमी वेळातचा सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाले आहे. नेटिझन्सनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.