कोविड रुग्णांना आगीतून वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी

भांडुपमधील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सापडलेल्या रुग्णालयातील कोव्हिड रुग्णांना वाचवण्यासाठी भांडुपमधील तरुणांनी गुरुवारी रात्री आपल्या जीवाची पर्वा न करता थेट मॉलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मार्ग करून देत त्यांनी बाहेर काढलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात पोहचवण्याचे काम पार पाडत माणुकसकीचे दर्शन घडवले.

    मुंबई (Mumbai).  भांडुपमधील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सापडलेल्या रुग्णालयातील कोव्हिड रुग्णांना वाचवण्यासाठी भांडुपमधील तरुणांनी गुरुवारी रात्री आपल्या जीवाची पर्वा न करता थेट मॉलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मार्ग करून देत त्यांनी बाहेर काढलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात पोहचवण्याचे काम पार पाडत माणुकसकीचे दर्शन घडवले.

    भांडुपमधील सनशाईन रुग्णालयाला आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या रोहित सुर्वेला डॉ. विशाल यादव यांचा फोन आला. डॉ. विशाल यादव यांच्याकडे येणारे कोविड रुग्ण हे सनशाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे त्यांना आग लागल्याच्या कळताच त्यांनी रोहितला दूरध्वनी केला. रोहितने क्षणाचाही विलंब न करता मित्र किरण गायचोर याच्यासोबत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. मॉलच्या परिसरात हे दोघेही पोचले असता त्यांना बाहेर परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबाय व काही रुग्ण उभे असलेले दिसले. त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता एका महिला डॉक्टरने रडत रडतच त्यांना आतमध्ये ६० ते ७० रुग्ण अडकले असल्याचे सांगितले.

    हे ऐकताच ते दोघेही मॉलमध्ये शिरले. मात्र काही अंतरावरच त्यांना संपूर्ण धूराने वेढल्यामुळे व समोरील काहीच दिसत नसल्याने ते पुन्हा बाहेर आले. त्याचवेळी रुग्णालयातील एका डॉक्टरने एलबीएस रोडच्या बाजूने रुग्णालयात जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मॉलमध्ये शिरत असतानाच त्यांना समोरून अग्निशमन दलाची गाडी येताना दिसल्याने त्यांनी त्यांना पुढे न जाता गाडी आतमध्ये नेण्यास सांगितले. मात्र आतमध्ये काही गाड्या उभ्या असल्याने अग्निशमन दलाच्या गाडीला अडथळा येत होता. त्यामुळे रोहित, किरण व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन ते तीन तरुणांनी तेथे उभ्या असलेल्या गाड्यांना धक्का मारून बाजूला करत अग्निशमन दलाच्या गाडीला जागा करून दिल्याने अग्निशमन दलाची गाडी थेट मॉलच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचली.

    त्याचवेळी तिसर्‍या मजल्यावर अडकलेल्या काही रुग्णांनी त्यांच्या मोबाईलच्या टॉर्च लाईटने ते अडकल्याची जागा दाखवल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तिसर्‍या मजल्यापर्यंत शिडी नेत १२.३० च्या सुमारास पहिला रुग्ण बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर दुसरा व तिसरा रुग्णाला बाहेर काढण्यात आले.

    पहिल्या रुग्णाला बाहेर काढल्यानंतर रोहित सुर्वे या तरुणाने त्याला पंचमुखी सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेतून बडवाईक रुग्णालयात नेले. मात्र कोविड रुग्ण असल्याने त्यांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. मात्र रोहित यांनी त्यांना परिस्थिती समजवून सांगितल्यानंतर त्यांनी एका रुममध्ये रुग्णासाठी जागा करून त्याला दाखल करून घेत व्हेंटिलेटर लावले. त्यानंतर दुसरा व तिसर्‍या रुग्णाला फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले.

    सनशाईन रुग्णालयातून बाहेर काढण्यात येणार्‍या रुग्णांना धूरामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. ते मोठमोठ्याने धापा टाकत होते. त्यांचे अंग व कपडे हे धुरामुळे कळकट्ट माखले होते. आगीतून बाहेर काढलेले हे सर्व रुग्ण प्रचंड घाबरलेले होते. त्यांना रोहित व किरण यांनी धीर देत रुग्णालयात दाखल केले. त्याचदरम्यान तेथे आलेल्या स्थानिक प्रतिनिधी व काही राजकीय नेत्यांनी रुग्णांना मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये नेण्याचे सुचवले. मुलुंडला नेईपर्यंत रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने ज्या रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. त्यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे रोहितने सांगितले.

    सुरुवातीला अग्निशमन दलाची एकच गाडी व पंचमुखी सेवा संस्थेची एकच रुग्णवाहिका होती. त्यामुळे रुग्णांना बाहेर काढण्यात आणि काढलेल्या रुग्णांना रुग्णालयात नेण्यात अडचणी येत होत्या. मात्र रात्री तीनच्या सुमारास आग अधिक वाढल्यानंतर अग्निशमन दलाच्या व रुग्णवाहिका आणखी गाड्या आल्या. त्यानंतर मॉलच्या काचा फोडून आत अडकलेल्या रुग्ण व अन्य व्यक्तींना बाहेेर काढण्याला वेग आला. बाहेर काढण्यात येत असलेल्या प्रत्येक रुग्णाची परिस्थिती गंभीर होती. मॉलमधून शेवटचा रुग्ण हा ५.३० ते ५.४५ च्या दरम्यान बाहेर काढण्यात आला.

    १० रोबोटच्या माध्यमातून केली पाहणी
    आगीच्या विळख्यातून ५.३० च्या सुमारास सर्व रुग्णांना बाहेर काढल्यानंतर आगीने अधिकच भडका घेतला. त्यामुळे आतमध्ये शिरणे अग्निशमन दलाच्या जवानांही शक्य होत नव्हते. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी १० रोबोट आतमध्ये पाठवले. या रोबोटने आतमधील परिस्थितीच पाहणी केल्याचे रोहित सुर्वेे यांनी सांगितले.