‘तरुण कार्यकर्त्यांचा काँग्रेसला राम राम’ काँग्रेसचं गणित नेमकं कुठं गंडलंय ?

‘काँग्रेसने अनेक तरूण नेत्यांना गमावलं आहे. ज्योतिरादित्य, सचिन पायलट पासून साकेत गोखले, मुखर्जी परिवार, पंजाब मधील वरिष्ठ नेते, पक्षाच्या अस्थिरतेवर लिहिणारे २३ नेते हे सर्व एपिसोड पक्षातील खदखद दाखवणारे आहेत.’

  लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसने मात्र अजून कात टाकलेली नाही. निष्ठावान समजले जाणारे अनेक कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकत आहेत. काही दिवसांपुर्वीच माजी राष्ट्रपती व नेते प्रणब मुखर्जी यांच्या मुलाने तृणमुलमध्ये प्रवेश केला. काल त्यांच्या मुलीने सक्रीय राजकारणापासून संन्याय जाहिर केला. आता पंजाबमध्ये देखील काँग्रेस अस्थिर होत आहे.

  ज्या राजीव गांधी यांनी पक्षावाढिसाठी तरुणांना एकत्र केलं त्यांना आर्थीक व कार्यकर्त्याचं बळ दिलं आणि सक्रीय राजकारणात आणलं आज त्याच काँग्रेसला तरुण कार्यकर्ते आता रामराम ठोकत असल्याने काँग्रेसचं गणित नेमकं कुठं गंडलंय? असा प्रश्न पडतो.

  ‘काँग्रेसने अनेक तरूण नेत्यांना गमावलं’

  याच प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार व मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतलं की, ‘काँग्रेसच्या पडझडीबाबत आता विश्लेषण करणे म्हणजेही वेळेची बरबादी आहे असं मला वाटतं. देशातील एकूण परिस्थितीचा आवाका अजून काँग्रेस नेतृत्वाला आलेला नाही. युपीए चं अध्यक्ष पद काँग्रेसेतर पक्षाकडे सोपवून काँग्रेसने आपलं घर सुधारायला घेतलं पाहिजे.’

  ‘काँग्रेसने अनेक तरूण नेत्यांना गमावलं आहे. ज्योतिरादित्य, सचिन पायलट पासून साकेत गोखले, मुखर्जी परिवार, पंजाब मधील वरिष्ठ नेते, पक्षाच्या अस्थिरतेवर लिहिणारे २३ नेते हे सर्व एपिसोड पक्षातील खदखद दाखवणारे आहेत.’

  ‘राहुल गांधी यांनी पक्षाला वैचारिक चौकटीवर कायम ठेवलं असलं तरी निवडणुकांच्या प्लानिंग आणि मायक्रो प्लानिंग, संघटन बांधणी वर त्यांचे फारसे लक्ष दिसत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणुकां लढवाव्या आणि जिंकाव्या लागतात, नवीन मित्र जोडावे लागतात, नवनवीन रणनीती बनवावी लागते. १ अधिक १ दोन असं राजकारणात होत नाही. त्यामुळे वैयक्तिक आवडीनिवडी, मत-मतांतरे दूर ठेवून राहुल गांधी यांना विविध राजकीय पक्षांशी राजकीय आघाडी बनवावी लागेल, सध्या ते वैचारिक आघाडी बनवण्याकडे जास्त लक्ष देतायत असं वाटतंय.’

  ‘लोकशाही, यंत्रणांचा गैरवापर, महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्वाचे विषय असतानाही काँग्रेस रस्त्यावर आपलं अस्तित्व दाखवू शकली नाहीय. नेते कम्फर्ट झोन मध्ये आहेत. हा पक्ष नेत्यांची गरज म्हणून सुरू आहे, अशी या पक्षाची स्थिती आहे.’

  ‘काँग्रेस हा पक्ष नसुन तो एक विचार आहे’

  हाच प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना विचारला असता त्यांनी सांगीतलं की, “मुळात काँग्रेस हा पक्ष नसुन तो एक विचार आहे. आजही देशातील अनेक भागात काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आहेत. फक्त गरज आहे ती त्यांना बळ देण्याची.”

  “जसा भाजपकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे तसा काँग्रेसकडे चेहरा नाही. असला तरी त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे तो पुढे येत नाही. कोणताही वाढवायचा असेल तर त्यासाठी मोर्चेबांधणी करणं गरजेचं ती काँग्रेसकडून होताना दिसत नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  तर वाचकहो या पत्रकारांच्या प्रतिक्रियांवरुन मुळात काँग्रेसचं बेसीकच गंडल्याचं लक्षात येत.

  काँग्रेसच्या या स्थितीवर तुम्हाला काय वाटतं ते कंमेंटबॉक्समध्ये सांगा.