नगरपरिषदेचा मनमानी कारभार: नियम शर्थी बदलून दिला ठेका

पालघर नगर परिषद हद्दीतील गटारे साफ करणे,गटार खोदणे विविध ठिकाणी तांत्रिक कामांसाठी तसेच भौतिक सुविधांसाठी यंत्रसामुग्री घेणे यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते.या निविदा प्रक्रिया अंतर्गत जेसीबी,पोकलेन, डंपर,हायड्रा,क्रेन, कटर आधी यंत्रसामुग्री वर्षभराच्या कालावधीसाठी आरोग्य विभागासाठी घेतल्या जात आहेत.

पालघर :पालघर नगर परिषदेच्या (Municipal Counci) विविध कामांसाठी कंत्राटी तत्त्वाने घेण्यात येणारे जेसीबी, पोकलेन, डंपर आदी निविदा संदर्भात निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर पालघर नगर परिषदेने कंत्राटदाराच्या फायद्यासाठी अटी-शर्ती मध्ये बदल केल्याने ही निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केला आहे.

पालघर नगर परिषद हद्दीतील गटारे साफ करणे,गटार खोदणे विविध ठिकाणी तांत्रिक कामांसाठी तसेच भौतिक सुविधांसाठी यंत्रसामुग्री घेणे यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते.या निविदा प्रक्रिया अंतर्गत जेसीबी,पोकलेन, डंपर,हायड्रा,क्रेन, कटर आधी यंत्रसामुग्री वर्षभराच्या कालावधीसाठी आरोग्य विभागासाठी घेतल्या जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या निविदा राबवले जातात. यामध्ये निविदा प्रक्रिया नियमाप्रमाणे ठेकेदाराने अटी शर्ती पाळणे बंधनकारक आहे.ही निविदा प्रक्रिया राबवताना अटी व शर्तींचा भंग केल्याचे दिसून येते त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणीही नंदकुमार पाटील यांनी विविध ठिकाणी केली आहे.

निविदेतील अटी शर्तींचा बदल किंवा ती अट कमी करावयाची असल्यास तो मसुदा नगर परिषदेने सभेपुढे ठेवणे अपेक्षित आहे.नगरपरिषदेने तसे केलेले नाही. सभेची मान्यता न घेता थेट या ठेकेदाराच्या फायद्यासाठी अट बदलून ही प्रक्रिया बेकायदेशीर,बेभरवश्याची असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. याचबरोबरीने कंत्राटदाराला देण्यात आलेले काम ज्यादा दराचे असून याआधीचे देण्यात आलेले काम हे कमी दराचे आहे.त्यामुळे नगरपरिषदेचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

ही माहिती सभागृह समोर ठेवणे आरोग्य विभागाला बंधनकारक होते. मात्र आरोग्य विभागाने ही माहिती लपवून सभागृहाचा अपमान केलेला आहे व नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केलेले आहे.त्यामुळे कायद्याचे उल्लंघन नगरपरिषदेने केले असल्याचे आरोप पाटील यांनी केले आहेत या निविदेमध्ये आर्थिक स्पर्धा झालेले नसून अस्तित्वातील निविदा दरापेक्षा कितीतरी अधिक दराने निविदा नगरपरिषदेने सादर केलेले आहेत. त्यामुळे नगरपरिषद निधीचे आर्थिक नुकसान होणार आहे.गुरुवारी होणाऱ्या सभेत ही बेकायदेशीर निविदा प्रक्रिया रद्द होईल का असा उपस्थित होत आहे.

निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात येऊ नये अन्यथा नगरपरिषदेच्या नुकसानीला नगरपरिषद स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील. नगरपरिषदेने ही निविदा रद्द न केल्यास न्यायालयात या विरोधात दाद मागणार आहे.

नंदकुमार पाटील,माजी नगराध्यक्ष

संबंधित प्रकरण पाहून सांगावे लागेल.माहिती घेऊन आपणास कळविले जाईल.

स्वाती देशपांडे-कुलकर्णी,मुख्याधिकारी

कंत्राटदाराच्या फायद्यासाठी निविदा प्रक्रियेच्या अटींमध्ये बदल केला असेल तर ही बाब खपवून घेतले जाणार नाही अशी तथ्य आढळल्यास निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणार आहे.

रोहिणी अंबुरे,नगरसेविका,भाजप

नियम अटी बद्दलण्याबाबतचा सर्वस्वी अधिकार नगरपरिषदेचा आहे.निविदा प्रक्रिया समितीने या प्रक्रियेला मान्यता दिली आहे.अनुभव दाखल्याची अट शिथिल नाही केली तर नवीन कंत्राटदार काम कसे करणार?

अमोल पाटील,आरोग्य सभापती