palghar health centre

पालघर(palghar) शहरातील जुने ग्रँड मेडिकल महाविद्यालय व सर जे. जे समूह वैद्यकीय महाविद्याल्याच्या तर्फे सुरु असलेल्या आणि ७२ वर्ष जुनी प्रसूतीगृहाची इमारत संरचनात्मक परिक्षणामध्ये धोकादायक इमारत ठरवली गेली आहे. तरीही  या ठिकाणी दर महिन्याला ३० ते ४० प्रसूती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संतोष चुरी, पालघर : पालघर(palghar) शहरातील जुने ग्रँड मेडिकल महाविद्यालय व सर जे. जे समूह वैद्यकीय महाविद्याल्याच्या तर्फे सुरु असलेल्या आणि ७२ वर्ष जुनी प्रसूतीगृहाची इमारत संरचनात्मक परिक्षणामध्ये धोकादायक इमारत ठरवली गेली आहे. तरीही  या ठिकाणी दर महिन्याला ३० ते ४० प्रसूती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याच विभागाकडे अस्तित्वात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या निवासी इमारतीची दुरुस्ती व डागडुजी करून त्या ठिकाणी हे प्रसूतीगृह स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी तीन कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी देखील बजेटमध्ये हे काम मंजूर नसल्याने दुरुस्तीचे काम खोळंबून राहिले आहे.असे असले तरी धोकादायक इमारतींमध्ये दंत चिकित्सा, लसीकरण, एनसी क्लिनिक तसेच प्रसूतीगृह सुरू ठेवणे गरजेचे झाले आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची सोय व्हावी तसेच आरोग्य सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे. समूह रुग्णालय संचालित पालघर आरोग्य पथकाच्या जागेमध्ये तसेच या विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय क्षेत्र व मनुष्यबळाची सांगड घालून एकत्रितपणे मिनी सिव्हील (शल्य) रुग्णालय स्थापन करण्याचे विचाराधीन होते.

सध्या आरोग्य पथकाकडून याच धोकादायक इमारतीमध्ये प्रसूतीगृह चालवले जाते ते १९४८ साली बांधलेल्या माता बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने एका पाहणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे मिनी शल्य रूग्णालय स्थापन करण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर २० खाटांचा नवीन वॉर्ड स्थापन करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयात नवीन मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या धोकादायक इमारती मधील प्रसूती गृह व आंतररुग्ण विभाग नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार असून बाह्य विभाग तसेच कार्यालयीन कामकाज, प्रशिक्षण व इतर विभाग जागेच्या उपलब्धतेनुसार या जुन्या इमारतीत सुरू ठेवण्याचे प्रस्तावित आहे.

पालघर येथे जिल्हा निर्मिती होऊन पाच वर्षांचा कार्यकाळ झाला असला तरी देखील जिल्हा शल्य रुग्णालयाची उभारणी करण्याचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी ठाणे व मुंबई येथे पाचारण करावे लागत असते, तसेच अनेक रुग्ण हे गुजरात राज्यातील वलसाड व वापी येथे उपचार घेण्याचे पसंत करत असल्याचे दिसून आले आहे.

तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही लेखी द्यावे आम्ही माहीती अशी देऊ शकत नाही. अशा आम्हाला सूचना आहेत.

- पल्लवी उपलप, सहयोगी प्राध्यापक -आरोग्य पथक पालघर