wedding invitation

कोरोनाच्या भितीमुळे विवाहसोहळ्याचे आमंत्रण आता छपाई केलेल्या पत्रिकेद्वारे न देता ते सोशल मीडियावर तयार केलेल्या डिजिटल पत्रिकेद्वारे दिले जात आहे. यामुळे छपाई व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रविंद्र माने वसई: लग्नाला फक्त पन्नास वऱ्हाडी उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आल्यामुळे आमंत्रण पत्रिका छपाई करणाऱ्या व्यावसायिकांवर ऐन मोसमात उपासमारीची वेळ आली आहे.जागतिक कोरोना महामारीच्या काळात विवाह सोहळे अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची पद्धत रूढ झाल्याने वसई तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरत असतानाही हीच पद्धत अवलंबली जात असल्याचे दिसून येते. पूर्वी घरोघरी, नातेवाईकांकडे आमंत्रण पत्रिका वाटप केल्याशिवाय लग्नाचे आमंत्रण पूर्ण होत नसते. आमंत्रण ही मान-सन्मान देणारी बाबच कोरोनाने आता हद्दपार केली आहे.

कोरोनाचा प्रभाव वसईमध्ये असल्याने तसेच विवाहसोहळ्यांसाठी वर्‍हाडी मंडळींची मर्यादित उपस्थिती असे शासकीय नियम असल्याने तालुक्यातील लग्नसोहळे कमी खर्चात अत्यंत साधेपणाने उरकले जात आहेत. कोरोनाच्या भितीमुळे विवाहसोहळ्याचे आमंत्रण आता छपाई केलेल्या पत्रिकेद्वारे न देता ते सोशल मीडियावर तयार केलेल्या डिजिटल पत्रिकेद्वारे दिले जात आहे. सोशल मीडियाचा अवलंब आता खेडोपाडीदेखील होत असल्याने उन्हातान्हात फिरून पत्रिका वाटण्यापेक्षा सोशल मीडियाचा यावेळी प्रभावी वापर केला जात आहे. मात्र सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे पारंपरिक छपाई व्यवसायावर गदा आली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कारागिरांची सध्या उपासमार सुरू असल्याने त्यांच्यासाठी हा काळ कठीण मानला जात आहे.

कमी संख्येत विवाह सोहळे होत असल्याने लग्नपत्रिकांची छपाई सध्या पूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे नऊ महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शैक्षणिक साहित्याची छपाई बंदच आहे. नऊ महिन्यांच्या काळात वसई, विरार, नालासोपारा शहरातील प्रिंटिंग क्षेत्रातील व्यावसायिकांचे तब्बल ५ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले असून, सध्याही ९० टक्के व्यवसाय बंद असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. कोरोना काळात छपाई यंत्रे बंद असल्याने देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचा मोठा भुर्दंड सोसावा लागल्याने व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

ऐन मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर एप्रिल ते जून या काळात होणारा लग्नसराईमधील व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. विवाह सोहळे न झाल्याने लग्नपत्रिकांची छपाई बंद होती. सध्या ५० पेक्षा जास्त जणांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी नसल्याने कमी संख्येतच सोहळा उरकला जात आहे. त्यामुळे कोणीच आता लग्नपत्रिका छापत नाही. त्याऐवजी डिजिटल स्वरूपात सोशल मीडियाद्वारे वाटप केली जात आहे. त्यामुळे लग्नपत्रिका छपाईमधून होणारा लाखो रुपयांचा धंदाही बुडाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शाळा-महाविद्यालयांना लागणार्‍या सर्व साहित्याची छपाई बंद आहे. दोन-तीन महिने शासकीय कार्यालये बंद होती. अनलॉक झाले तरी सामान्य माणूस शासकीय कार्यालयाकडे फिरकत नव्हता, तसेच शासकीय सोयी-सुविधा ऑनलाईन झाल्याने शासकीय कागदपत्रांची छपाई बंद झाली आहे.

प्रिंटिंगच्या कामातून वर्षभरात वीस ते पंचवीस लाखांची उलाढाल होत असे मात्र कोरोनाच्या काळात या धंद्यात ९० टक्के फटका बसला आहे. फक्त ५० आमंत्रण पत्रिका छापण्यात येत असल्यामुळे हा धंदा आता झेरॉक्स वाल्यांकडे वळला आहे. ५० पत्रिकेचे बाराशे ते चौदाशे रुपये होत असल्यामुळे झेरॉक्स वाल्याकडे फक्त दोनशे रुपयांत आमंत्रण पत्रिका टाईप करून त्याच्या कलर झेरॉक्स काढून त्याद्वारे निमंत्रण देण्यात येत आहे.

- सुनीना रोडे, डी.माईल्ड प्रिंटर्स, नालासोपारा