palghar holi

ग्रामीण भागामध्ये आजही होळी(holi celebration) पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. नवीन लग्न झालेली जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेवुन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पालघरमधील(holi in palghar) काही भागांंमध्ये आहे.  त्याची आजही अंमलबजावणी होत आहे.

    अमोल सांबरे, विक्रमगड: आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे(celebration of festival) रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी,आलोंडा,तलवाडा,डोल्हारी,सारशी, दादडे,ओंदे, झडपोली,सजन, शिळ आदीविध भागात मात्र आजही पारंपारिक पद्धतीनेच सण साजरे करण्यात येतात.

    या गावांमध्ये एक गाव होळीची परंपरा आजही आबाधित ठेवली आहे. याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी,नगरात छोटया मोठया होळया पेटवुन नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात.

     बायकोला खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा

    होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी) अगर बांबुच्या फांदया होळी माता म्हणुन आणुन त्याची पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई पापडया,पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तुंचा नैवैद्य दाखविला जातो. बांबु किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लु बांधले जाते ही प्रथा आजही अबाधित आहे. त्याच प्रमाणे नवीन लग्न झालेली जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेवुन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पालघरमधील काही भागांंमध्ये आहे.  त्याची आजही अंमलबजावणी होत आहे.

    पहिले तीन दिवस छोटया होळया,चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच २८मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपारिक ग्वाही देत आहे.

    चोरट्या होळीसाठी तरुण गावातुनच लाकडे चोरुन आणतात. पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते. या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते. गावातील नवविवाहीत जोडपी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे. त्यानंतर होळी पेटविली जाते. होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडत असते. साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालत असतात कारण त्यांना एक वेगळाच आनंद त्यापासुन मिळतो.

    दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात. याच माळावर पाच दिवस विविध खेळ,गरबानृत्य,मनोरंजनात्मक कार्यक्रम,तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य,ढोलनाच,लेझीम, सामुहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात.

    होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात. धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते. तर रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासुन तयार केलेले नैसर्गिक रंगच वापरले जातात.

    होळीसाठी विक्रमगड बाजार फुलला
    विक्रमगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणजे विक्रमगड शहर तसे गावागावात आठवडाबाजार भरतात. मात्र सणाकरीता विक्रमगड शहरातून खरेदी करण्याची एक वेगळीच प्रथाच आहे. त्यानुसार होळीसाठी सद्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असुन आजु बाजूच्या खेड्यावरील लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीत असुन पोसत मागण्याकरीता वेगवेगळया वेषात त्यामध्ये कुणी पुरुष महिलेचे कपडे घालुन त्या वेशात तर कुणी तोंडाला अंगाला रंग लावुन वेगळा पेहराव करुन अगर फुटलेल्या पत्र्याचा डबा वाजवत ,तोंडाला जोकर आदींचा मुखवटा लावुन घराघरातुन दुकानदारांकडुन पोसत(पैसे) मागत आहे. हेच दृश्य धुळवडीपर्यंत चालत असते. तर विक्रमगड बाजारात साखरेच्या पाकापासुन तयार केलेल्या रेडीमेट गठया(हार)व वेगवेगळया डिझाईनमध्ये असलेल्या पिचकाऱ्यांची खरेदी होताना दिसत आहे. दरम्यान होळीसाठी विक्रमगड बाजार फुलेला दिसत आहे.

    महागाईचे सावट
    सर्वसामान्य माणसाला जगणेही नकोसे करुन टाकलेल्या महागाईचा फटका यावर्षी होळी सणालाही बसणार आहे. सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कर्ज काढुन सन साजरे करण्याची वेळ आली आहे.
    भालीपाला,कडधान्ये अशा वस्तुबरोबर जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले प्रचंड दर सध्या सर्वाच्याच आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक सणाला वस्तुच्या किंमती वाढत असुन होळीसाठी असलेली गाठी (साखरेची माळ)यंदा महागली आहे. पिचकाऱ्यांचे दरही वाढलेले आहेत. महागाई कितीही वाढली असली तरी सण थोड्या प्रमाणात तरी साजरा करण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला आहे.