fish market

कोरोनाचे आगमन झाले व ऑनलाईन खरेदी-विक्री(online fish selling) व्यवहाराला चांगलीच गती आली.मात्र ऑनलाईन मासेविक्रीमुळे पारंपारिक पद्धतीने विक्री करणाऱ्या मच्छीमार समाजाला मात्र जबर फटका बसला आहे.

  रविंद्र माने, वसई : इतर वस्तूंप्रमाणेच सर्व प्रकारचे मासे ऑनलाईन(online fish sell) मिळू लागले आहेत. यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे. मात्र किरकोळ मासे विक्रेत्या महिलांसह मच्छिमार बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

  कोरोनाचे आगमन झाले व ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहाराला चांगलीच गती आली.मात्र या प्रणालीमुळे पारंपारिक पद्धतीने विक्री करणाऱ्या मच्छीमार समाजाला मात्र जबर फटका बसला आहे. खोल समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालून पुरुष मच्छिमारांनी पकडलेले मासे मच्छीमार बांधवांच्या महिला वसई विरारमधील प्रत्येक नाक्यावर बसून थेट विक्री करतात. ग्राहक आणि मच्छिमारांमध्ये कोणतेही दलाल नसल्यामुळे ग्राहकांना ताजे आणि चांगली माणसे स्वस्त दरात उपलब्ध होतात.तर मच्छिमार महिलांनाही थेट विक्रीमुळे चांगल्याप्रकारे आवक होते.मच्छी विक्रेत्या महिला आठवड्यातुन बुधवार,शुक्रवार व रविवार असे तीनच दिवस मासे विक्री करून आठवडाभराचा नफा कमवतात.

  लॉकडाऊनच्या काळात तब्बल नऊ महिने धंदे बंद असल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो होतो.लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर त्यातून कसेबसे सावरत असताना आता ऑनलाईन कंपन्यांचा शिरकाव आमच्या धंद्यात झाला आहे. त्यामुळे आमची खाटीक पिढी नामशेष होण्याची भिती वाटत आहे.

  - राजेंद्र पेंढारी, जय भवानी मटन शॉप,तुळींज

  लॉकडाऊनमुळे मात्र त्यांच्या या व्यवसायावर गदा आली होती. पकडलेल्या माशांची विक्री रस्त्यावर बसून त्यांना करता येत नव्हती.या गोष्टीचा लाभ उठवत काही दलालांनी मच्छीमारांकडून थेट मच्छी खरेदी करून तिची ऑनलाईन किंवा सोशल मीडिया आणि फोनवरून विक्री करण्यास सुरुवात केली.

  लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नाक्यावर बसून मच्छी विक्री करण्याचा प्रयत्न करतोय.मात्र रस्त्यावर येऊन खरेदी करण्याची लोकांची मानसिकता बदलली आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. ऑनलाईन मासे खरेदी करण्यात येत असल्यामुळे हे संकट आमच्यावर ओढवलं याची माहिती मिळाली आहे.

  - शैला मेहेर ,मच्छिमार महिला,अर्नाळा

  रस्त्यावर मासे मिळत नसल्यामुळे घरी बसलेल्या ग्राहकांना ऑनलाईन मासे मिळू लागल्यामुळे त्यांच्या मासे खरेदीचा मार्ग बदलला. नाक्यावर जाऊन घासाघीस करून मासे खरेदी करण्याची कटकट असल्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे जास्तीत जास्त ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मच्छिमार महिला पुन्हा एकदा नाक्यानाक्यांवर मासे विक्रीसाठी उन्हातान्हात बसू लागल्या आहेत.मात्र ऑनलाईन मासे खरेदीची सवय लागलेल्या ग्राहकांनी या महिलांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चार तासांमध्ये करणाऱ्या विक्रीसाठी दिवसभर या महिलांना रस्त्यावर बसावे लागत आहे. सध्या अनेक खाजगी कंपन्या मासे विक्रीच्या व्यवसायात उतरल्या असून त्या घरपोच सर्विस देत आहेत.ऑनलाईनवर मिळणाऱ्या माशांचा दर ४० ते ५० रु.अधिक असला तरी त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

  याच व्यवसायातील अनेक कंपन्यांनी आता चिकन व मटणही ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यास सुरुवात केली असून त्यालाही खवय्यांकडून चांगली मागणी आहे.त्यामुळे या व्यवसायालाही फटका बसू लागला आहे.

  अशाप्रकारच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे वर्षानुवर्षे मच्छीमार्केट व रस्त्याच्या कडेला बसून मासे विक्री करणाऱ्या मच्छीविक्रेत्या महिलांची आवक दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्यास टाळाटाळ करत असतो.अशावेळी ही ऑनलाईन खरेदी त्यांचा आधार ठरत आहे.