mumbai ahmadabad highway

मुंबई -अहमदाबाद महामार्गांवर(Mumbai Ahmadabad highway) तलासरी ते घोडबंदर दरम्यान मार्गांवर अजूनही बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कट ठेवलेले असून त्यामुळे अपघाताची संख्या वाढतच आहे.

कासा : मुंबई -अहमदाबाद महामार्गांवर(Mumbai Ahmadabad highway) तलासरी ते घोडबंदर दरम्यान मार्गांवर अजूनही बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कट ठेवलेले असून त्यामुळे अपघाताची संख्या वाढतच आहे. आंबोली, चारोटी एशियन पंप, तवा चिंचपाडा, मनोर नांदगाव,मनोर गेट हॉटेल, सातीवली, या ठिकाणी अनधिकृत कट असल्याने महामार्गावरून वेगात जाणारी वाहने या कट वरून येणारी वाहने यात अपघात होतात या साठी स्थानिक नागरिक, संस्था, पदाधिकारी यांनी आंदोलने केली. पण अजूनही कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही.हे कट अजून बंद होत नाहीत, त्यामुळे अपघाताची संख्या वाढतच आहे.

काही कट तर हॉटेल, धाबे, पेट्रोलपंप यांसाठी जाणून बुजून ठेवले आहेत. त्यामागे मोठे अर्थकारण असावे, अशी शंका वाहनचालक व्यक्त करीत आहेत. या महामार्गावर मोठ-मोठी वाहने धावत असल्याने मध्येच ब्रेक मारू शकत नाहीत तसे केल्यास अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काहीवेळा तर समोरच्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात अचानक ब्रेक घेतल्यावर वाहन पलटी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अनधिकृत कटमुळे आंबोली, चारोटी एशियन पंप जवळ, मनोर नांदगाव येथे नेहमी अपघात होत आहेत या साठी पुन्हा आंदोलन करावे लागेल असे चारोटी येथील समाजमित्र संघटनेचे अध्यक्ष संतोष देशमुख म्हणाले. या अपघातात स्थानिक तरुण, वाहन चालक, प्रवासी मृत्युमुखी पडतात त्यामुळे हे कट बंद करावेत .

अनेक वेळा वृत्तपत्रांमध्येदेखील अनधिकृत कटच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या. मात्र आज वर या गोष्टी कडे महामार्ग प्राधिकरण विभाग तसेच शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये हजारो निष्पाप लोकांना या अनधिकृत कटमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच नेमकं घोड अडलं तरी कुठे? महामार्ग प्राधिकरण कुठलीही ठोस उपाययोजना का करत नाही?अजून किती लोकांचा बळी गेल्यावर महामार्ग प्राधिकरण विभागाला जाग येणार आहे.? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

नवीन वर्षात यासाठी आंदोलन उभारले जाईल. त्यासाठी टोलनाका बंद केला जाईल आणि महामार्ग प्रशासनाला जाब विचारला जाईल.- अमित घोडा -माजी आमदार, रानशेत

महामार्ग प्रशासनाकडे या बाबतीत माहिती पाठविली आहे. अनेक कटवर आमच्या पद्धतीने उपाययोजना केल्या आहेत, विविध लाईट, सूचना फलक , रेडियम सिग्नलने दर्शविल्या आहेत. या धोकादायक जागी पांढरे पट्टे मारून सावधान चे उपाय योजले आहेत. तरी पण महामार्ग प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यास हे कट बंद केले जातील.
– एस. सूर्यवंशी,चारोटी विभाग-महामार्ग अधिकारी