मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचे बरणीत अडकले डोके; सफाळ्यातील सर्पमित्रांनी वाचवले प्राण

बरणीमध्ये डोके अडकून जीवाचा आतांक करत फिरणाऱ्या पालघर (Palghar) शहरातील एका मोकाट कुत्र्याचे (Dog) प्राण सफाळे येथील सर्पमित्रांनी वाचविल्याची घटना घडली आहे.

पालघर : पालघर शहरातील (Palghar City) पाचबत्ती ते मुक्ता सोनोग्राफी सेंटर (Mukta Sonography Center) या परिसरात काही दिवसांपासून एक मोकाट कुत्रा (Dog) डोक्यामध्ये बरणी अडकलेल्या परिस्तिथीत सैरवैर फिरत होता. तेथील स्थानिक नागरिकांनी व प्राणीमित्र वैशाली चव्हाण (Vaishali Chavan) यांनी सफाळे येथील सर्पमित्र ग्रुपला त्याची माहिती दिली. त्यानुसार सर्पमित्र रेस्क्यू टीमने (Rescue team) तत्काळ पालघर येथे जाऊन त्या मोकाट कुत्र्याचा शोध सुरू केला.

काही तासांच्या अथक प्रयत्नांनी तो कुत्रा सापडला. मात्र जिवाच्या आकांताने तो धावत सुटल्याने त्याला पकडणे जिकिरीचे व धोकादायक बनले होते. मात्र, सर्पमित्रांनी हा धोका पत्कारून जाळ्याच्या साहाय्याने अखेर त्याला पकडले. मोठ्या शिताफीने त्यांनी डोक्यात अडकलेली बरणी काढून त्या मुक्या जनावराची त्रासातून मुक्तता केली. हे रेस्क्यू ऑपरेशन सर्पमित्र प्रशांत उर्फ पिंट्या मानकर, निलेश राजड, येशू डिमेलो, उमेश पठारी, रोहन पवार, अभय सुमडा, नितीन जोगरे यांनी आपली जीवाची बाजी लावून पार पाडले.

आम्ही गेल्या ८ ते १० वर्षांपासून विषारी साप व अजगर यांना मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात सुखरूप सोडून देण्याचे काम करतो. दरम्यान, आम्ही विहिरीत पडलेले मोकाट कुत्रे किंवा गाई आदींचेही प्राण वाचविण्यात सुरुवात केली. मनुष्य असो किंवा प्राणी जेव्हा जेव्हा जो जो संकटात असेल तेव्हा आम्ही त्यांना वाचविण्यासाठी धावून जाणार असा आम्ही पणच केल्याने प्रत्येक प्रसंगासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.

प्रशांत (पिंट्या) मानकर, सर्पमित्र सफाळे.