सुरण लागवड शेतकऱ्यांना ठरतेय वरदान, सफाळे परिसरात सुरणाची लागवड

कोरोना संक्रमण काळात सफाळे, वसई, बोईसर भागातील ९१ शेतकऱ्यांनी सुरणाची लागवड केली आहे. ही लागवड जवळपास १०० % यशस्वी झाली आहे. येत्या काही दिवसांतच सुरण शेतातून बाहेर येतील. यातील काही सुरण हे पुढल्या वर्षीचे बियाणे म्हणून ठेवण्यात येतील तर काही सुरण विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले जातील. 

पालघर : एप्रिल-मे दरम्यान कोविडमुळे (Covid) पाड्यांवरील बदललेल्या परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. बरेच शेतकरी, शेतमजूर हे उपजीविका साधनांच्या अभावी हवालदिल झाले होते. त्यांच्यासोबत केलेल्या चर्चांमधूनच त्यांचे हताशपण समोर येत होते. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकर्ते आणि वाणगावचे अनिल पाटील यांच्या सहकार्याने सेवा सहयोगने एक नवीन योजना आखली. कोरोना संक्रमण काळात सफाळे, वसई, बोईसर भागातील ९१ शेतकऱ्यांनी सुरणाची लागवड केली आहे. ही लागवड जवळपास १०० % यशस्वी झाली आहे. येत्या काही दिवसांतच सुरण शेतातून बाहेर येतील. यातील काही सुरण हे पुढल्या वर्षीचे बियाणे म्हणून ठेवण्यात येतील तर काही सुरण विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले जातील.
सुरणाच्या योग्य वाढीसाठी केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला आहे. सुरण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आणि गुणकारी असून त्याला बाजारातही वर्षभर चांगली मागणी असते. सुरण लावण्यासाठी कसदार जमीन असावी लागते असेही नाही. एकूण लागवडीपैकी ५८ % शेतकऱ्यांनी लागवड आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा परसबागेत लागवड केली आहे. तर ४२ % शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लागवड केली आहे. शेतकऱ्यांच्या मशागतीच्या केलेल्या सर्वेक्षणातून सुद्धा हे दिसून आले की ८५ % शेतकऱ्यांनी लागवड पूर्व मशागत ही योग्य रीतीने पार पाडली.
येत्या पंधरवड्यात सुरण शेतातून बाहेर येतील. शेतकऱ्यांना ते स्थनिक बाजारपेठांमध्ये विकता येतील. तसेच काही सुरण हे थेट शहरांतील मित्र परिवारांना खरेदी सुद्धा करता येतील. प्रत्येक संकट हे आपल्या सोबत काही संधी सुद्धा घेऊन येतं. त्यामुळे कुठल्याही संकटाच्या क्षणी खचून न जाता त्यातून संधी शोधण्याचा प्रयत्न आपण जर केला तर ते संकट एका सोनेरी संधीत सुद्धा बदलू शकतं! विशेष म्हणजे लागवड करणारे ४०% शेतकरी हे तरूण-तरुणी आहेत.

सुरण आमच्याकडे काही लोक घराच्या आजूबाजूला लावतात; पण त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. सुरणातून पैसे मिळतात हे काही आम्हाला माहिती नव्हते; पण यावेळी पहिल्यांदाच आम्ही सुरणाची लागवड सारखी केली. त्यात काही फार आम्हाला बघावे लागले नाही. आणि लागवड सुद्धा छान झाली. सेवा सहयोगने आम्हाला बियाणे उपलब्ध करून दिले आणि लागवडीचे प्रशिक्षण सुद्धा दिले. पुढल्या वर्षी आम्ही आता जास्त सुरण लावू!

पेणंद गावातील एक शेतकरी बंधू