vasai google image

वसईत(vasai)सिमेंट काँक्रिटीकरणाचे जंगल वाढत आहे. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु झाला आहे . यातच आता वसई पूर्वेला डोंगर , डबके चोरीला गेले असून झाडांचीदेखील मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ही लूटमार नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास वाढीस लागणार आहे.

विशाल राजेमहाडीक, वसई : वसईत(vasai)सिमेंट काँक्रिटीकरणाचे जंगल वाढत आहे. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु झाला आहे . यातच आता वसई पूर्वेला डोंगर , डबके चोरीला गेले असून झाडांचीदेखील मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ही लूटमार नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास वाढीस लागणार आहे.

 

पूर्वेकडील भोईदापाडा येथील वाघरळपाडा भागात दोन ते तीन वर्षांपूर्वी नैसर्गिक पाण्याचे डबके , डोंगर आणि वृक्षांनी नटलेला परिसर होता.  हिरवागार निसर्ग आता मात्र याठिकाणी दिसत नसून अनधिकृत बांधकामांचे लोण वाढत आहे. १०० हून अधिक झाडे नाहीशी झाली आहेत. तर डबके , डोंगर देखील दिसेनासे झाले असल्याने नेमके गेले कुठे असा प्रश्नच निर्माण होत आहे.

एकीकडे झाडे लावा झाडांचे सर्वधन करा असा प्रचार शासनाकडून केला जातो , निसर्ग वाचविण्यासाठी घोषणा केल्या जातात. पर्यावरण हा जागतिक चिंतेचा विषय बनत चालला असताना मात्र वसईत याला बगल दिली जात असल्याचे दिसून येत आहे. वसईच्या तहसीलदार कार्यलयातून याबाबत अहवाल मागविण्यात आला परंतु संबंधित अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचे समजते.

वसई पूर्वेला भातशेतीसह विविध पिकांची लागवड केली जायची परंतु हळूहळू शेती नष्ट होत आहे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत देखील कमी झाले आहेत अशातच निसर्ग साधनसंपत्तीचे संवर्धन व्हायला हवे असताना देखील याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक ठिकाणी डोंगर पोखरून बांधकामे केली जात असताना कारवाईचा बडगा उगारला जात नाही व नागरिक वस्ती उभी राहत आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर भविष्यात अशाचप्रकारे निसर्गाची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहता, वसई तहसीलदार उज्वला भगत यांंनी मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना तातडीने बोलावून या जागेचा पंचनामा करावयास सांगितलं होता. ८ डिसेंबर रोजी हे सांगून सुद्धा अजून हा पंचनामा झाला नसल्याचे कळते. “तो खूप मोठा गट आहे आणि मला एकट्याला नाही  जमणार. मला सोबत एक तलाठी सुद्धा लागणार”, असे सोनावणे म्हणाले. त्यामुळे मनुष्यबळ असल्यावरच हे काम होणार एवढे मात्र नक्की. तोपर्यंत पर्यावरणाचे संवर्धन कोण करणार हे अद्याप कोणालाच माहित नाही.

वाघरळपाडा येथील डबके , डोंगर यासह झाडांची झालेली कत्तल याबाबत तहसील कार्यलयाने मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यास सांगितले परंतु कार्यवाही केली गेली नसल्याने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली का दाखवली जात आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टीप – बातमीसाठी गुगल अर्थची मदत घेतली आहे. त्याचे स्क्रिनशॉट वापरले आहेत.