वसई विरार पालिकेकडून वसुलीसाठी तगादा, पाणीपट्टी न भरणाऱ्यांना पुरवठा खंडित करण्याची धमकी

पाणीपट्टी वसुली व्हावी म्हणून पाणी पुरवठा खंडीत करण्याची धमकी वसई विरार महापालिकेकडून देण्यात आल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत.

वसई : पाणीपट्टी(water tax) वसुली व्हावी म्हणून पाणी पुरवठा(water supply) खंडीत करण्याची धमकी वसई विरार महापालिकेकडून|(vasai virar corporation) देण्यात आल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ९ महिने व्यवसाय,धंदे,दुकाने,कामकाज बंद होते.या ९ महिन्यांमध्ये सर्व व्यापार्‍यांना,दुकानदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता.लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कामकाज सुरु करून हा तोटा थोड्याफार प्रमाणात भरुन काढण्याच्या प्रयत्नात असताना पालिकेने त्यांना वसुलीचा दणका दिला आहे.

दुकाने उघडल्यानंतर वीज बिले भरण्याचे आव्हान व्यापार्‍यांपुढे उभे राहिले.त्यानंतर घरपट्टीचे मागणीपत्र त्यांच्या हाती पडले. हे कमी की काय त्या पाठोपाठ ट्रेड लायसन्स कराच्या नोटीसा व्यापार्‍यांना दुकानदारांना बजावण्यात आल्या.ट्रेड लायसन्स घेवून हा कर पंधरा दिवसांत न भरल्यास दुकाने सील करण्याची धमकी नोटीसीत देण्यात आली होती.

मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत पोळी-भाजी केंद्र बंद असल्यामुळे पाण्याचा वापर झालाच नाही. तरिही पालिकेकडून पाणीपट्टी भरण्याची नोटीस आली आहे.पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा खंडीत होई.,मग पाण्याशिवाय केंद्र कसे चालवावे हा प्रश्‍न निर्माण होईल. गाळे सील करण्याचे आदेशही त्यात नमुद करण्यात आले आहेत.

- शोभा मोरे, चालक,श्रमिक महिला पोळी-भाजी केंद्र

व्यापारासाठी पैसा कसा उभा करायचा या विवंचनेत असताना,९ महिन्यांचे लाईटबील,घरपट्टी,ट्रेड लायसन्स अगोदर भरावे लागेल अन्यथा वीज पुरवठा खंडीत होईल,घरपट्टी आणि ट्रेड लायसन्स कर न भरल्यास दुकानालाच टाळे ठोकण्यात येणार असल्यामुळे व्यापारी भयभीत झाले असताना, पालिकेने आता त्यांना पाणीपट्टीच्या नावाखाली तिसरी नोटीस बजावली आहे.पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा खंडीत करण्याची धमकीही पालिकेने दिली आहे.९ महिन्यांपासून दुकाने बंद असल्यामुळे वीज आणि पाण्याचा वापर झालाच नाही. धंदाच बंद असताना पालिकेला व्यापार कर कसा भरायचा असा प्रश्‍न आता त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. मात्र पालिकेच्या या करांकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने सील होवून धंद्यावरच कुर्‍हाड कोसळणार असल्याचे संकट त्यांच्यापुढे उभे राहिले आहे.

सर्वसाधारणपणे कनेक्शन दिल्यानंतर पाणीपट्टी लागू होते.किती वापर झाला यावर पाणीपट्टी अवलंबून नसते.पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा तोडण्याची तरतूद आहे.

- सुरेंद्र ठाकरे,अभियंता,पाणी पुरवठा विभाग

महिलांच्या पोळी-भाजी केंद्रांची परिस्थिती त्याहूनही बिकट झाली आहे.लॉकडाऊनपासून रोजगार,पैसा,अन्न-धान्य सर्वच संपल्यानंतर हे सर्व कर कसे भरायचे या विवंचनेत त्या सापडल्या आहेत.महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून निरनिराळ्या योजना राबवल्या जात असताना पालिकेकडून मात्र पाणीपट्टी,घरपट्टी ट्रेड लायसन्सच्या नावाखाली त्यांची गळचेपी केली जात आहे.