sagunabag honey going to japan

सगुणा बागेचे(Saguna Baug) नाव आता सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचणार आहे. कृषी पर्यटनासोबत(Agricultural Tourism) शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये नवनवे प्रयोग करताना मधुमक्षिका पालन हा नवा प्रयोग सगुणा बागेचे चंदन भडसावळे यांनी केला होता. त्यातून तयार झालेल्या नैसर्गिक मधाच्या (Natural Honey Delivered To Japan)गोडीची थेट जपानला भुरळ पाडली आहे.

  दीपक पाटील, कर्जत : रायगड(Raigad) जिल्ह्यातील कृषी पर्यटनात अग्रगण्य आणि लोकप्रिय असलेल्या सगुणा बागेचे(Saguna Baug) नाव आता सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचणार आहे. कृषी पर्यटनासोबत(Agricultural Tourism) शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये नवनवे प्रयोग करताना मधुमक्षिका पालन हा नवा प्रयोग सगुणा बागेचे चंदन भडसावळे यांनी केला होता. त्यातून तयार झालेल्या नैसर्गिक मधाच्या (Natural Honey Delivered To Japan)गोडीची थेट जपानला भुरळ पाडली आहे. त्यामुळे या मधाची आता जपान वारी होणार आहे. लॉकडाऊन काळात राबवलेल्या या उपक्रमाने भडसावळे यांनी या उद्योगातून नव्या वाटा शोधत तरुणांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यासोबतच मधुमक्षिका पालन व्यवसायाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.

  लोकांना धकाधकीच्या जीवनापासून गावाकडील नितळ, निर्मल, प्रदूषणमुक्त वातावरणाची कायम ओढ असते. त्याला कृषी पर्यटन हे उत्तम मात्रा ठरत आहे. कृषी पर्यटनाचा विषय समाेर आला की, रायगड जिल्ह्यातील सगुणा बागेची आठवण हटकून येतेच. स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ भडसावळे यांचे पुत्र कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी शेतीत नव्या वाटा चोखंदळायचे ठरवले होते. उच्चशिक्षित असूनही त्यांनी आपल्या मालेगाव येथील शेतीतच नवनवे प्रयोग करत शेतीपूरक काहीतरी करायचे ठरवले आणि त्यातून सगुणा बाग उदयास आली.

  पर्यटकांमध्ये क्रेझ असलेल्या सगुणा बागेतील कृषी पर्यटनाला मागील लॉकडाऊन काळात फटका बसला. तेव्हा सुमारे १३० कामगारांचा प्रश्न चंदन भडसावळे यांच्या समोर होता. त्यातच त्यांचे शेतीपूरक वेगवेगळे प्रयोग कायम सुरूच असतात. तेव्हा त्यांनी मधुमक्षिका पालन सुरू केले होते. या उद्योगाला अधिक चालना देण्याचे त्यांनी ठरवले. सगुणा बागेकडे १३५ मधुमक्षिका पालनाच्या पेट्या आहेत. त्यापासून सुमारे १५ प्रकारच्या मधाचे उत्पादन केले जाते. यासाठी त्यांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक मधुमक्षिका पालकांसोबत करार केले आहेत. जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे आणि उत्तम दर्जाचे मध मिळू शकेल. ठाणे येथील सगुणा बागेच्या दुकानात मध विक्री करत असताना मधाचा उत्तम दर्जा आणि चव यामुळे एका गृहस्थांनी चंदन भडसावळे यांना जपानबद्दल सांगितले. नमुना म्हणून जपानला गेलेल्या मधाची गोडीने जपान्यांनाही भुरळ पडली. त्यांच्या सगळ्या चाचण्यांमध्ये मधाची शुद्धता खरी ठरली. त्यामुळे साधारण साडे सात हजार बाटल्यांची ऑर्डर भडसावळे यांना मिळाली आहे. तेव्हा लवकरच सगुणा बागेतील मध हे जपानवारी करणार आहे.

  शेतीचे उत्पन्नही भरघोस
  मधुमक्षिका पालनाच्या पेट्या शेतात ठेवल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न देखील भरघोस येते हाही त्याचा दुहेरी फायदा आहे. तसेच मिश्र मध उत्पादनासाठी २५ पेट्या या सगुणा बागेत ठेवल्याचे भडसावळे यांनी सांगितले आहे. वर्षभरातुन साधारण दोन वेळा मध काढण्याचे काम केले जाते. सगळीकडून पेट्या या सगुणा बागेत आणून त्यातील मध हे काढण्यात येते. त्यानंतर त्यातील मध वेगळा करून त्यातील मेणाचे तुकडे आदी गोष्टी बाजूला करून उत्तम दर्जेदार आणि नैसर्गिक मध बाटलीबंद केला जातो.

  स्थानिकांच्या रोजगारावर भर
  लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी कामगार कपात करण्यात आली होती. आर्थिक तोटा सहन किती करायचा आणि कसा करायचा असा प्रश्न सर्वांसमोर होता. तसाच तो सगुणा बागेत देखील होता. साधारण १३० कामगार असेलल्या बागेतील कामगारांना काहीही करून काढायचे नाही असा निर्णय चंदन यांनी घेतला. बागेत आजही सर्व कामगार हे स्थानिक आहेत. स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी भडसावळे कुटुंबाची कायम भूमिका राहिलेली आहे.

  बागेत १५ प्रकारचे मध
  बागेतील मधामध्ये एकूण १५ प्रकार आहेत. त्यामध्ये बोर, जांभूळ, तुळस, बाभूळ, मोहरी, निलगिरी, वन्य, मिश्र, बडीशेप, लिची, सूर्यफूल, तीळ, ओवा असे काही प्रकार आहेत.

  एका पेटीतून २५ किलो मध
  गुजरात, राजस्थान, बिहार, महाराष्ट्रात पुणे, घाट भाग अशा ठिकाणी सध्या मधुमक्षिका पालनाच्या पेट्या सद्य स्थितीत ठेवलेल्या आहेत. यासाठी दर महिन्याला जाऊन त्याची नीट निगा राखली गेली आहे का, पेटीचे आरोग्य आदी गोष्टी ते स्वतः जाऊन पाहतात. सध्या एका पेटीमधून २५ किलो मध मिळतो. तर मध उत्पादनासाठी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा या माशीचे पालन केले जाते.

  शेतीत नवनवीन प्रयोग सुरूच
  कृषी पर्यटनाचा जन्म झाला आणि बघता बघता सर्वांच्या तो पसंतीसही उतरला. मात्र यासोबत त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग करणे सोडले नाही. तेव्हा आजची नवी एसआरटी भात लागवड पद्धत असेल, किंवा डोंगरावरील वणवे रोखण्यासाठी केलेले प्रयत्न असतील किंवा नदीवरील मोठे संकट बनून आलेली जलपर्णीची समस्या दूर करण्यासाठीची त्यांचे यशस्वी प्रयोग असतील हे त्याचेच द्योतक आहे. केवळ शेखर भडसावळेच नाही तर संबंध भडसावळे कुटुंबाची नाळ शेतीशी जोडलेली आहे. त्यांचाच वसा आज त्यांचा मुलगा चंदन भडसावळे हे चालवत आहेत.