इंद्रायणी घाटात गॅस टँकर पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली

इंद्रायणी घाटात एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली़ अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली़ मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली़ त्यानंतर सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात आणली.

उरण : चिरनेर- खारपाडा मार्गावर असणाऱ्या इंद्रायणी घाटात (A gas tanker overturned in Indrayani) एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली़ अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली़ मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली़ त्यानंतर सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात आणली. उरण बीपीसीएल कंपनीमधून अलिबाग उसर एचपीसीएल येथे निघालेला एचपीजी गॅस टँकर इंद्रायणी घाटातील दिघाटी वळणावर येताच ड्रायव्हरचा ताबा सुटला़ सुमारे ५० टन गॅस असलेला हा टँकर वस्ती असलेल्या घराजवळ पलटी झाला.

टँकर जांभळीच्या झाडाला धडकला नसता तर लगतच्या घरामध्ये घुसला असता़ तातडीने घरातील व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले. गॅस गळती होत असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली होती उपस्थितींना पनवेल तालुका पोलीस ठाण्याला सदर अपघाताची कल्पना दिली़ सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेलाही पाचारण केले. अग्निशमन कर्मचारी व पोलीस यंत्रणेने परिस्थिती व्यवस्थित हाताळून चिरनेर-खारपाडा मार्गावरची वाहतूक बंद केली.

वायुगळती होत असलेल्या टँकर मधून तो गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून मोठा धोका टाळला. कालांतराने अपघातग्रस्त टँकर क्रेनने पूर्ववत करण्यात आला.यावेळी उरण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौडकर आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.