खंडाळा घाटात अपघात सत्र सुरूच, बुधवारी मध्यरात्र ते गुरुवार पहाटे पर्यंत तीन भीषण अपघात

बुधवारी मध्यरात्री नंतर पहिला अपघात खंडाळा घाटातील दुसऱ्या उतारावर घडला. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी गाडी अनियंत्रित होऊन महामार्गाखालील खड्ड्यात जाऊन उलटली. यात एक जखमी झाला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट आडोशी उतारावर टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक झाली. यात टेम्पोमधील दोघे गंभीर जखमी झाले.

    खोपोली: मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील अपघातांचे सत्र पाचव्या दिवशीही सुरूच होते. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत खंडाळा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात घडले. यात पाच जण जखमी झाले असून, दोन ठिकाणी अपघातग्रस्त वाहने उलटून महामार्गावर आडवी झाल्याने येथील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

    बुधवारी मध्यरात्री नंतर पहिला अपघात खंडाळा घाटातील दुसऱ्या उतारावर घडला. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी गाडी अनियंत्रित होऊन महामार्गाखालील खड्ड्यात जाऊन उलटली. यात एक जखमी झाला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट आडोशी उतारावर टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक झाली. यात टेम्पोमधील दोघे गंभीर जखमी झाले.

    अपघातातील जखमींना उपचारासाठी नेले जात नाही तोच अमृतांजन ब्रिजजवळ मुंबई लेनवर पहाटे तीनच्या सुमारास बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार धडक झाली. यात ट्रकमधील संपूर्ण सामान रस्त्यावर विखुरले गेले. त्यात अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आयआरबी पेट्रोलिंग टीमला अथक परिश्रम करून यश आले.

    या दरम्यान जवळ-जवळ तीन तास एक्सप्रेस वे वरील वाहतूक बाधित झाली होती.  एका लेनवरून सर्व वाहनांना व्यवस्थित मार्गी लावत आयआरबी पेट्रोलिंगच्या टीमने जादा मजूर आणून विखुरलेले सामान एकत्र करून सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी संपुर्ण मोकळा केला.