बाथरुमला जायच्या बहाण्याने तो जेलच्या बाहेर पडला अन् पोलिसांची नजर चुकवून पळून गेला, पोलीस दलात उडाली खळबळ

रज्जाक चापरबंद असे आरोपीचे नाव असून तो मुळचा कर्नाटकातील विजापूरचा रहिवासी आहे. सध्या तो महाड तालुक्यातील काळीज येथे राहत होता. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात(Mahad MIDC police)गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने १ एप्रिल २०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिल्याने तो (criminal ran away from jail)एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता.

    महाड : पोक्सो(POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने महाड एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीतून पलायन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे . मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

    रज्जाक चापरबंद असे आरोपीचे नाव असून तो मुळचा कर्नाटकातील विजापूरचा रहिवासी आहे. सध्या तो महाड तालुक्यातील काळीज येथे राहत होता. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने १ एप्रिल २०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिल्याने तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता.

    मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याला जेवण देण्यात आले. त्यानंतर तो हात धुण्याच्या आणि बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने तो कोठडीतून बाहेर पडला आणि उपनिरिक्षक पवार आणि गार्ड सावंत यांची नजर चुकवून त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

    घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपीच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

    या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक सागर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रज्जाक चापरबंद याच्या विरोधात भा.दं.वि.स. कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज गिरी हे करित आहेत.