अनंत गीते यांची अवस्था ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी पक्ष हा सिध्दांतावर... पवारसाहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर... शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष या राज्यात आहेच परंतु देशाच्या जडणघडणीत पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कुणी बोलल्याने कमी होणार नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

    मुंबई – अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

    अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही परंतु सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्‍या कृतीचं भान राहिलेलं नाही असाही टोला सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला आहे.

    राष्ट्रवादी पक्ष हा सिध्दांतावर… पवारसाहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर… शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष या राज्यात आहेच परंतु देशाच्या जडणघडणीत पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कुणी बोलल्याने कमी होणार नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

    अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले या घटनेचा मी साक्षीदार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

    भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याला अनंत गीते हे उत्तर देतील अशी भाबडी आशा शिवसैनिकांच्या मनात होती परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षनेतृत्वाबद्दल अशाप्रकारची वक्तव्ये आली त्यावेळी गळून पडला होता असा घणाघाती आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.