परप्रांतीय मजुरांना गावी पोहचविण्यासाठी कर्जतमधून ५ एस.टी.बस रवाना

कर्जत: लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन, आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न करत

कर्जत:  लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन, आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा या मजूर कुटूंबाना आपल्या घरी पोहचण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. कर्जत तालुक्यातून नुकत्याच ११० मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ५ बस रवाना करण्यात आल्या आहेत. 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढला. तेव्हा कर्जत, खालापूर तालुक्यातील परिसरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजूर तसेच महाराष्ट्र राज्य अंतर्गत निवासी मजुर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पायी चालत आपल्या गावाची वाट धरू लागले. सर्व मजूर कुटुंबांनी अनेक किलोमीटरची पायपीट आपल्या घराच्या ओढीने सुरू केली रस्त्यात ठिकठिकाणी अनेक अडचणींचा सामना करत त्यांची वाटचाल सुरूच आहे.  त्यामुळे कर्जत तालुक्यातील कळंब प्रशासनाच्या वतीने पायी चालत निघालेल्या मजुरांना त्यांच्या  गावी पोहचविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करून त्यांना इच्छित स्थळी रवाना करण्यात आले. कर्जत तालुक्यात खोपोली  खालापूर येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे सुमारे १९१ जण कर्जत तालुक्यातुन कर्जत मुरबाड महामार्गे आपल्या गावी चालत निघाले.  उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश,बिहार या राज्यात निघाले आहेत. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश ,बिहार ,छत्तीसगड, मध्यप्रदेश, येथील राहणारे आहेत तर काही महाराष्ट्र  राज्यातील जळगाव ,पाचोरा ,धरणगाव ,मुक्ताईनगर या भागातील असून आपल्या गावी चालत निघाले असल्याचे समजले या विषयी  माहिती कळताच कळंब पोलीस चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली. त्या सर्वांची आरोग्य तपासणी कळंब आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. निलेश यादव तसेच डॉक्टर योगेश पाटील यांनी तपासणी करवून घेऊन त्या सर्वांची राहण्याची  व्यवस्था कळंब पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आली .  पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे व महसूल कर्मचाऱ्यांनी या बाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कामगारांबद्दल माहिती दिली. 

सर्वांनीच याची तत्परतेने दखल घेऊन अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने या कामगारांचे ऑनलाईन फॉर्म भरून त्यांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले. काल कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी ,पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, तहसीलदार विक्रम देशमुख, नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील , नायब तहसीलदार संजय भालेराव, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत एस टी आगार प्रमुख  यांसह पोलीस प्रशासन ,महसूल विभागाच्या कर्मचारी वर्ग उपस्थित राहून सर्व अडकलेल्या मजुरांना कर्जत आगाराच्या चार बसेसद्वारे त्यांना आपापल्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली. परिवहन महामंडळाच्या ५ बसेस त्या ११० मजुरांना घेऊन रावेत, गोंदिया, या ठिकाणी रवाना झाल्या. अशोक शिंदे, विठ्ठल शामे, संदीप गावडे, देवराज, सुखदेव सांगळे, हे चालक म्हणून तर सुरेश पाटील, रोहन कोवे, संदीप वारे, शिवाजी मिसाळ, उत्तम कांबळे हे या बसचे वाहक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक बस मध्ये सीटवर एक व्यक्ती असे २२ जण अशी सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात जे काही मजूर आहेत. ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने पायी चालत आपल्या गावी निघालेले आहेत. तेव्हा असे कोणी आपल्याला दिसल्यास त्यांची विचारपूस करून त्यांना भुकेची गरज भागवून ऑनलाईन फॉर्म भरून देण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. कारण हातावर कमवून खाणारा हा मजूर वर्ग आहे. सध्या त्यांच्याकडे पैसे देखील नाहीत तेव्हा माणुसकीच्या नात्यातून आपण त्यांची मदत करणे गरजेचे आहे आज महाराष्ट्र  शासनाच्या वतीने  कळंब पोलीस चौकीत थांबलेल्या लोकांना  ठिकाणी एसटीच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे आज ११० मजुरांना घेऊन रवाना केले आहे . –  वैशाली परदेशी, प्रांताधिकारी कर्जत