
पालीमधील मूक आणि कर्णबधीर तरुण कलाकार चेतन पाशीलकर याच्या चित्रांनी सजलेल्या भिंती सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.पाली नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पालीत सर्वत्र राबविला जात आहे.
निशांत पवार, पाली : पाली शहरातील मोकळ्या, जर्जर व खराब झालेल्या भिंती आता आकर्षक, विलोभनीय आणि प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या झाल्या आहेत. पालीमधील मूक आणि कर्णबधीर तरुण कलाकार चेतन पाशीलकर याच्या चित्रांनी सजलेल्या भिंती सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.पाली नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पालीत सर्वत्र राबविला जात आहे.
सध्या सुधागड-पाली पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र आणि येथील इतर कार्यालयाच्या बाजूने असलेल्या संपूर्ण संरक्षक भिंतीवर आकर्षक चित्र व एकात्मतेचे आणि प्रबोधनात्मक संदेश देणारी चित्रे काढण्याचे काम सुरू आहे. या भिंतीवर वाघ, सिंह, हरीण, कुत्रा, धीवर आदि पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. याबरोबरच वृक्ष संवर्धन, सामाजिक, धार्मिक एकात्मता व आरोग्य संदेश देणारी आकर्षक चित्रे, कोरोना बाबत जनजागृती करणारी, शासनाच्या योजना व कामे आदींची माहिती या भिंतींवर चित्रित केली आहेत.
प्रशासक दिलीप रायन्नावर यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भिंती आकर्षक करून त्यातून प्रबोधन व जनजागृती करण्याचे हे काम खूप प्रभावी आहे. यातून हा परिसर विलोभनीय तर दिसेलच याबरोबर एकात्मतेची व आपल्या कर्तव्यांची आठवण देखील करत राहील.
- केतन म्हस्के, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र
ही चित्रे येथील तरुण चित्रकार चेतन पाशीलकर काढत आहे. चेतन पाशीलकर कर्णबधीर व मुके आहेत. ते जेजे स्कुल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांची पत्नी आरती पाशीलकर या डिजिटल पेंटिंगद्वारे स्टोरी बोर्ड तयार करते. तसेच कन्सेप्ट बनवितात आणि चेतन त्याद्वारे चित्र साकारतात. अशा प्रकारे चेतन यांना आरती या कामात मदत करत आहेत. आरती यांना कमी ऐकू येते.
प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या चित्रांसोबतच शास्त्रज्ञ व क्रांतिवीर यांची चित्रे व कामे, गडकिल्ले, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय नेते आदी चित्रे देखील पालीतील विविध ठिकाणच्या भिंतींवर साकारण्यात येणार आहेत. अशा प्रकारे पालीतील सर्व मोकळ्या आणि खराब झालेल्या भिंतींचा वापर प्रबोधनात्मक संदेश व जनजागृती करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती प्रशासक दिलीप रायन्नावर यांनी दिली.