प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्यांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • आवास, राजपुरी, मोठी जुई, बोर्ली या ठिकाणी असणार केंद्र

अलिबाग : ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अशा मोठ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्यांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, उरण आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांच्या ठिकाणी हे केंद्र उभारले जाईल. राज्य शासनाकडून अंतिम मंजूरीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या कामासाठी एकूण ८ कोटी ६ लक्ष ७२ हजार रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकांकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प व्यवस्थापकांकडे मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्यांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारची आपत्ती निर्माण होऊन मनुष्यहानी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या उरण तालुक्यातील मोठी जुई, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली, मुरुड तालुक्यातील राजपुरी व अलिबाग तालुक्यातील आवास अशा ४ ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. गावांमधील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करुन त्याचे रुपांतर चक्रीवादळ निवारा केंद्रात केले जाणार असून परिस्थितीनुरुप त्याचा वापर केला जाईल.

जिल्ह्याला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा फटका किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना बसत असतो. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसला होता. या वादळात मनुष्यहानी व वित्तहानी मोठ्याप्रमाणावर झाली होती. यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना होण्याबाबत नागरिकांमधून विचारणा होऊ लागली होती.

रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा तशाच आहेत. इंग्रजी तसेच खाजगी शाळांचे फॅड वाढल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या परिणामी दरवर्षी शाळांमधील मुलांच्या संख्येनुसार नजीकच्या शाळेत त्यांना पाठवून सदर शाळा बंद करण्यास जिल्हा परिषदेकडून सुरूवात झाली आजच्या घडीला अनेक शाळा बंद असल्यामुळे मोडकळीस आल्या आहेत. अशा शाळांचा चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यासठी उपयोग करून घेतल्यास आपत्तीची पूर्वकल्पना व मनुष्यहानी होऊ नये साठी त्याचा उपयोग होईल.

याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु झाली आहे. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना अंतिम मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे.

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे आयुष्यच बदलून टाकले. नारळ पोफळीच्या बागा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यातील बागा भूईसपाट झाल्या. वादळाची तीव्रता लक्षात न आल्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली तर अनेकांच्या घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले. घरातील पावसाळ्यासाठी भरलेली साधन सामुग्री यामध्ये भिजल्यामुळे तिची नासाडी झाली. बागायदारांचे तर पुढील दहा ते पंधरा वर्षे भरून निघणार नाही अशी आर्थिक हानी झाली आहे.

अतिवृष्टी – पूर हे रायगड जिल्ह्याला नवीन नाहीत. याचा परिणाम येथील जनजीवनावर होत आसतो. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तयार असले तरी नागरिकांचे होणारे नुकसान तुटपुंजे स्वरूपात मोबदला देऊन शासनाकडून मदत केल्याचा दिखावा केला जातो.

चक्री वादळ निवारा केंद्रासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. या केंद्रामुळे भविष्यात कोणताही आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना व शासनाला त्याचा फायदा होणार आहे. तसेच अशा वेगवेगळ्या संकटाला सहजरित्या हातळण्यास निवारा केंद्रांचा उपयोग होणार आहे.

निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड