poladpur water tank

देवेंद्र दरेकर, पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर(poladpur) तालुका हा दुर्गम डोंगराळ असून पावसाळा संपताच या तालुक्यातील बहुतांश गाव वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईमधून मुक्त करण्यासाठी शासनामार्फत जलस्वराज्य(jalswarajya) टप्पा २ अंतर्गत योजना देण्यात आली कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र या योजनेअंतर्गत झालेल्या टाक्या कुचकामी ठरल्या असून जवळजवळ सहा ठिकाणी उभारण्यात आलेल्या टाक्यांमधील २ ते ३ ठिकाणी पाणीसाठा(water storage) होत नाही. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा आजतागत कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही.

आता पंचायत समितीमार्फत या सर्व ग्रामपंचायतीना एक ठराव पाठवण्यात आला असून हा ठराव म्हणजे सरळसरळ दिशाभूल आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जलस्वराज्य टप्पा २ ही योजना परिपूर्ण असून त्या पासून सर्वांना पाणी पुरवठा होत आहे व या योजनेची पाहणी ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषदेचे वसंत राठोड (समाज व्यवस्थापन तज्ञ) अधिकारी यांनी केली असल्याचे दाखविले आहे. मात्र ही योजना सुरूवातीला नारळ फोडून ठेकेदार गेल्यानंतर साधा ठेकेदारसुद्धा या ठिकाणी फिरकला नाही तर अधिकारी तर आलेच नाहीत मग असे खोटे नाटे ठराव करून टाकीत पाणीच साठत नसून प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे असा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.

ही योजना पूर्ण झाली असून ती संबंधित ग्रामपंचायतीनी हस्तांतरण करून घ्यावी असा तगदा लावण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचदेखील संभ्रमात पडले आहेत. जर योजना पूर्ण नाही. नागरिकांना यातून पिण्यासाठी एक हंडा पाणी मिळत नसेल तर आम्ही ही योजना हस्तांतरीत कशी करून घ्यायची, असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायत सरपंच राकेश उतेकर यांना पडला आहे. जर ही योजना पूर्ण झाली असा दाखला ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आला तर सहाजिकच या सर्व गावे टँकरमुक्त म्हणून गणली जातील आणि पाणी टंचाई काळत पाण्यावाचून वंचित राहावे लागेल, याची भीती या गावातील ग्रामस्थांना भेडसावत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ व सरपंच करत आहेत.