कांदिवलीहून श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या गावी चालत निघालेल्या एका माणसाचा पेणजवळ मृत्यू

श्रीवर्धन: मुंबईतील कांदिवली या उपनगराकडून श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या गावी जाण्यासाठी मोतीराम जाधव नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह पायी चालत निघाली होती. परंतु मुंबई-गोवा महामार्गावरील पेण

 श्रीवर्धन: मुंबईतील कांदिवली या उपनगराकडून श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या गावी जाण्यासाठी मोतीराम जाधव नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह पायी चालत निघाली होती. परंतु मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्याच्या हद्दीतील जिते गावाजवळ या इसमाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्या ठिकाणी त्या इसमाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून परप्रांतीयांना त्यांच्या गावांमध्ये पोहोचवण्यासाठी एस. टी. महामंडळ त्याचप्रमाणे विविध वाहनांची सोय करून त्यांना मुंबईपर्यंत नेण्यात येत आहे. मात्र कोकणातल्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र शासन काही करू शकत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी ऑनलाईन परवानग्या दिल्या जात आहेत मात्र ते कोणत्या वाहनांनी जाणार याचा विचार शासन का करत नाही ही गोष्ट विचार करायला लावण्यासारखी आहे. आठ दिवसांपूर्वीदेखील श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे गावातील बांद्रे कुटुंबीय चालत येत असताना माणगाव या ठिकाणी सदर इसमाच्या पत्नीचे निधन झाले होते. रेल्वेखाली चिरडलेल्या परप्रांतीयांना शासनाने पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली. मात्र आपल्याच राज्यातील नागरिकांना अशा प्रकारे नुकसान भरपाई का दिली जात नाही हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. शासनाला परप्रांतीयांचा एवढा पुळका असेल तर ज्यांच्या मतांवर निवडून तुम्ही सत्तेत बसला आहात त्या मतदारांसाठी, नागरिकांसाठी शासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यामध्ये पोचवण्यासाठी एसटी महामंडळाची बस विनामूल्य देण्यात येत आहे. परंतु कोकणात जायचे असेल तर तुम्हाला २१ जणांचा ग्रुप करून प्रत्येक प्रवाशामागे सातशे ते आठशे रुपये भरून बस दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.