varandha Ghat crowd

महाड - भोर - पंढरपूर मार्गावरील(Mahad -Bhor- Pandharpur Road) वरंधा घाट (Varandha Ghat) हा पावसाळ्यात नेहमीच आकर्षित करित आला आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिरण्यावर बंधने आली असली तरी पावसाळा सुरु होताच पर्यटक वरंध घाटाकडे आकर्षित झाले आहेत.

    महाड: सह्याद्रीचे सौंदर्य अनुभवावे ते पावसाळ्यातच ! मुसळधार पाऊस, हिरवाईने नटलेलेले डोंगर कपारी, धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या खोल दऱ्या खोऱ्यांमध्ये झेपावणारे धबधबे आणि थेट आकाशाला भेदणारे सुळके. निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी सध्या वरंधा घाटात पर्यटकांचा(Tourists) ओघ वाढला आहे.

    महाड – भोर – पंढरपूर मार्गावरील(Mahad -Bhor- Pandharpur Road) वरंधा घाट (Varandha Ghat) हा पावसाळ्यात नेहमीच आकर्षित करित आला आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिरण्यावर बंधने आली असली तरी पावसाळा सुरु होताच पर्यटक वरंध घाटाकडे आकर्षित झाले आहेत. घाटातील निसर्गाचा आनंद लुटत आहेत. प्रामुख्याने पुणे शहर आणि परिसरातील तरुण या घाटातील निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी येतातच . घाटातून कामानिमित्त आपल्या वाहनातून किंवा एस.टी. मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील वाघजाई येथे काही काळ थांबून गरमागरम कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेत हा निसर्ग आपल्या ह्रदयात साठवून घेण्याचा मोह आवरत नाही. वाघजाई येथे न थांबता पुढे जाणे प्रत्येकासाठी अशक्यच.

    varandha ghat view

    सध्या कोरोना संकट काळात मात्र या घाटातील सौंदर्य अनुभवण्यासाठी होणारी गर्दी एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे या घाटात असलेल्या दोन बिबट्यांच्या वावरामुळे दुहेरी संकटाला निमंत्रण देणारी आहे. वाघजाई परिसरात पर्यटक आणि प्रवासी वाहनांची मोठीच गर्दी होते आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.

    माणगाव – पुणे मार्गावर ताम्हीणी घाटातील सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकाची गर्दी होवू लागताच केवळ फिरण्यासाठी येणाऱ्यांच्या चाचण्या करण्याची मोहिम मुळशी येथे सुरु करण्यात आली. तशा प्रकारची उपाय योजना वरंधा घाटात फिरायला येणाऱ्यांबाबतही करणे गरजेचे झाले आहे.

    varandha ghat

    या घाटमार्गात दोन बिबट्यांचा असलेला वावर देखील धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. महाड वनविभागाने बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवण्यासाठी घाटात गस्त सुरु केली आहे. एकट्या दुकट्या प्रवाशानी घाटमार्गातून दुचाकीने प्रवास टाळावा अशा सूचना महाड वनविभागाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.