वादळग्रस्तांसाठीच्या मदत वाटपावरून म्हसळ्यात राजकीय पक्षांमध्ये घोंगावतेय श्रेयवादाचे वादळ

श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा :रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यातील गाव खेड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना साथ रोगाशी लढा देत असतानाच आता निसर्ग

श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यातील गाव खेड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना साथ रोगाशी लढा देत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढले आहे. कोरोना आणि चक्रीवादळ अशा दुहेरी संकटात सापडलेल्या जनतेला थोडासा आधार देण्याच्या नावाखाली म्हसळा तालुक्यात मात्र राजकीय पक्षांचे मदत वाटपावरून श्रेयवादाचे वादळ उठले आहे. या वादळात राज्यातील महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन तू – तू, मै – मै करीत आरोप प्रत्यारोप करून तसेच निषेध नोंदवून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

मागील तीन चार महिने कोरोनाशी लढा देत असताना कंबरडा मोडलेली तालुक्यातील जनता चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णपणे हवालदिल झाली आहे.
वादळाने लोकांच्या घराचे छप्पर उडाले असून काही ठिकाणी संपूर्ण घरेच जमीनदोस्त झाली आहेत. ग्रामीण भागात नागरिकांनी काबाडकष्ट करून पोट माळ्यावर जमा करुन ठेवलेले अन्नधान्य, कडधान्य, आगोटीचा भरून ठेवलेला सामान, भांडी, कपडे सर्व काही अचानक आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसाने सर्वच भिजून गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे.  
वादळानंतर बऱ्याच दिवसांनी वादळग्रस्तांना काही सामाजिक व धार्मिक संस्था, शासन, राजकीय पक्ष यांच्याकडून थोडासा मदतीचा हात म्हणून कडधान्य, ताडपत्री व इतर काही साहित्य मदत स्वरूपात वाटप करण्यात आली आहेत. या वाटपावरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक श्रेयवाद सुरू आहे. वाटप करण्यात आलेले कडधान्य मदतीचे किट शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतात की, शिवसेना पक्षाकडून आलेले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सांगतात की धान्य वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत आहे. 
काही दिवसांपूर्वी म्हसळ्यात शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन कडधान्य वाटप शिवसेनेकडून होत आहे असे सांगितले होते. तर त्याच दिवशी म्हसळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी वाटप करण्यात येत असलेले कडधान्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्फत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. तर दोघांनीही एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करून राज्यात महाविकास आघाडीत एकत्रित सत्तेत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रायगड जिल्ह्यात मात्र सध्यातरी बिघाडी असल्याचे वास्तव समोर आणले आहे. अनिल नवगणे यांनी खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर धान्य वाटप वरून टीका केली होती. नवगणे यांनी केलेल्या टीकेला खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या राजकीय शैलीत सडेतोड उत्तर दिले होते.
वरिष्ठ नेते टीका करीत असतानाच म्हसळ्यातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा वादविवाद करण्यात मागे पडले नाहीत.तालुक्यातील पाभरे, मेंदडी, आंबेत, वरवठणे या चार गणात सध्या मदत वाटप काम सुरू आहे. या मदत वाटप किट मध्ये स्थानिक नेते, गाव पुढारी यांच्याकडूनही भेदभाव करीत असल्याची वस्तुस्थिती आहे. गोरगरिबांना आलेले धान्य त्यांच्यापर्यत पोहचत नाहीत उलट मधल्या मधेच गावचे स्वयंम घोषित गावपुढारी, सरपंच हे आपल्या मर्जीतील लोकांना धान्याचे किट रातोरात वाटप करीत आहेत.
वादळग्रस्तांसाठी राजकीय पक्षांकडून मदत येत असेल तर शासनाकडून मदत का मिळत नाही किंवा काय मदत आलेली होती का असा प्रश्न नागरिकांना पडला असून जर शासनातर्फे मदत आलेल्या कडधान्येच्या किटचे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच वाटप करीत आहेत की काय..? हा सुद्धा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. 
 
म्हसळा तालुक्यातील वादळग्रस्तांसाठी मदत म्हणून कडधान्ये, ताडपत्री, चादर असे साहित्य शिवसेना पक्षाकडून व पक्षाचेवरिष्ठ नेते, मंत्री यांच्याकडून वैयक्तिक रित्या ही मदत स्वरूपात वस्तू आल्या होत्या त्याचे आम्ही काही गावागावात वाटप केले आहे. परंतु आम्ही कधीही वाटप करताना प्रसिद्धी घेतली नाही. उलटपक्षी इतर पक्षाचे काही पदाधिकारी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेले साहित्य आपल्याच पक्षाकडून आले आहे असे जनतेला सांगून सोयीस्करपणे श्रेय घेत आहेत. तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम न करता निःपक्षपाती काम केले पाहिजे. अनेक गावांत काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच व्यक्तीला तीन-चार वेळा धान्याचे किट वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.
                                                                                                       –  महादेव पाटील, शिवसेना प्रमुख – म्हसळा तालुका तथा माजी सभापती
 
कोरोना व लॉकडाऊनचे सुरुवातीपासूनच आम्ही तळागाळातील जनतेत मिसळून काम करीत आहोत. आमचे नेते खासदार सुनिल तटकरे साहेब, राज्यमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जनतेची सेवा करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून आलेली कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे मार्फत गरजू लोकांपर्यंत पोहचवीत आहोत. काही लोक आता तीन चार महिन्यांनंतर बाहेर आले आहेत आणि जनतेची सेवा करीत असल्याचे सांगत आहेत. हे लोक कोरोनाचे सुरुवातीला कुठे होते हे अगोदर जनतेला सांगावे नंतर आमच्यावर टीका करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा तटकरे कुटुंबीयांकडून आलेली मदत आम्हीच वाटणार ना, का आमच्या विरोधकांना बोलावणार. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा जनतेत मिसळून काम करण्यावर भर द्यावे.  –  समिर बनकर, अध्यक्ष – म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष