रायगडची ‘सिलिंडर वूमन’ : मनगटातील जोरावर संघर्षाशी दोन हात, ‘ती’च्या मजबूत खांद्यावर तिचं करिअर आणि संसारही

किचनमधला गॅस (Gas Cylinder) संपला की, काही महिला नवरा येईपर्यंत थांबतात (Women wait until the husband arrives). तो आला की, सिलिंडर जोडला जातो अन् उरलेला स्वयंपाक सुरु होतो. का? तर भरलेला सिलिंडर उचलायचा म्हणजे गंमत वाटली की काय? कल्पना रोज हे काम करते. एक नाही तर गाडीभर सिलिंडर पोहोच करते.

  • नेरळमधील कल्पनाने संसार आणि सिलिंडर दोन्ही खांद्यावर पेलले

दिपक पाटील, रायगड :

रायगड-नेरळ गावात एक महिला आहे… नाव कल्पना हिलाल… तिच्या मजबूत खांद्यावर तिचं करिअर आणि संसार उभा आहे. दोन हातांनी मजबूत पकडलेला सिलिंडर त्याच गतीने खांद्यावर घ्यायचा आणि त्याच जोमाने : पायर्‍या चढत तुमच्या उंबर्‍यापर्यंत तो पोहोच करायचा… हेच तिचं करिअर आहे. ती ‘सिलिंडर वुमन’ आहे. श्रमात आपला पांडुरंग शोधते.

किचनमधला गॅस संपला की, काही महिला नवरा येईपर्यंत थांबतात. तो आला की, सिलिंडर जोडला जातो अन् उरलेला स्वयंपाक सुरु होतो. का? तर भरलेला सिलिंडर उचलायचा म्हणजे गंमत वाटली की काय? कल्पना रोज हे काम करते. एक नाही तर गाडीभर सिलिंडर पोहोच करते. न थकता, न कुरकुरता. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई, मोठी बहीण यांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन तिने घर सावरले.

अवजड वाट निवडत प्रेरणादायी प्रवास

कुठलेही काम हे छोटे किंवा मोठे नसते ही आईकडून मिळालेली शिकवण तिने अंगिकारली. अल्प शिक्षणामुळे धुणी-भांडी, घरकाम असे पडेल ते काम तिने केले. जोर फक्त पुरुषी मनगटात आहे, या गोष्टीला तिने छेद देत अवजड वाट निवडत गॅस सिलिंडर घरोघरी पोहचवण्याचे काम स्वीकारले. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे राहणाऱ्या कल्पना पांडुरंग हिलाल यांची ही संघर्षमयी कहाणी इतरांसाठी प्रेरणादायीच आहे.

दुचाकीपासून ते विमानापर्यंत स्टेअरिंग सांभाळत बाईने आकाशात झेप घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या सर्व क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यात कल्पना यांनी निवडलेली वाट थोडी वेगळी. १२ वर्षांची असल्यापासून कल्पना हिने घर सावरायला सुरवात केली. तिने सायकलवर सिलिंडर पोहोचवायला सुरुवात केली.

२० वर्षांपासून जिद्द आणि नेटाने काम सुरू

काम अवघड, मेहनतीचे असले, तरी तिने ते जिद्दीने स्वीकारले. हे काम सुरू करताना अनेकांसाठी हा हास्यास्पद विषय होता . मात्र महिलेच्याही मनगटात जोर आहे. ती कुठेही कमी नाही, हे कल्पना हिने दाखवून दिले. सुरुवातीला कल्पनाने पाच वर्षे सायकलवर सिलिंडर पोहचवले. सायकलवर दिवसभरात जेमतेम ५ ते ७ सिलेंडर पोहचवता यायचे . त्यानंतर सेकंड हँड स्कूटर घेऊन सिलिंडर पोहचवण्यास तिने सुरुवात केली. हार न मानता जिद्दीने सुमारे २० वर्षांपासून कल्पना काम जिद्दिने, नेटाने आणि धैर्याने हे काम करते आहे.

वजन उचलणं हे सोप्पं काम नाही. म्हणूनच सिलिंडर घेऊन गेल्यावर गृहिणी आपसूक चौकशी करून चहा-पाणी विचारतात. एक महिला सिलेंडर घेऊन येते म्हटल्यावर सगळ्या महिला घरातील सिलेंडर संपल्यावर मला बोलावू लागल्या. यामुळे आपल्याला अधिक प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे कोणत्याही महिलेने त्यांच्या घरातील गॅसची टाकी संपली आहे, असा फोन करताच तत्पर सेवा देते.

कल्पना हिलाल, सिलेंडर वूमन