sarasgad event

रायगड(Raigad) जिल्ह्यातील पालीजवळील सरसगडावर ( Sarasgad) झालेल्या एका कार्यक्रमात तलवारी (Swords ) नाचवण्यात आल्या. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.

निशांत पवार, पाली : रायगड(Raigad) जिल्ह्यातील पालीजवळील सरसगडावर ( Sarasgad) झालेल्या एका कार्यक्रमात तलवारी (Swords ) नाचवण्यात आल्या. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. वेध सह्याद्री प्रतिष्ठानने सरसगडावर २४ व २५ तारखेला  सरसगड किल्ल्यावर  श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे समजते.

सरगडावर कार्यक्रम झाला याची आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती. तसेच कोणत्याही कार्यक्रमात तलवारी फिरविणे बेकायदेशीर आहे.

- विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली

गडकिल्ल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा तेथे  शिवभक्त जावेत व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे या उद्देशाने वेध सह्याद्री प्रतिष्ठानने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी गडावर दिशादर्शक फलक व किल्ल्याच्या नकाशाचे फलक लावण्यात आले. मात्र तलवारी नाचविल्याने व कोरोनाच्या नियमांना फाटा दिल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय झाला आहे.

पोस्ट वाचून बरीच मंडळी आली होती गडावर. त्यातील काहींनी त्यांच्या सोबत तलवारी आणल्या होत्या. वेध सह्याद्रीच्या पोस्ट मध्ये तलवारी आणा असे आवाहन करण्यात आले नव्हते.

- आकाश घरडे, वेध सह्याद्री प्रतिष्ठान

सरसगडावर फक्त साफसफाई केली जाईल व झेंडा लावण्यात येईल,अशी तोंडी माहिती देण्यात आली होती. लेखी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड

दरम्यान नंग्या तलवारी नाचविल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला असल्याचे समजते. यावेळी भंडारा उधळत कोरोनाच्या नियमांना फाटा देण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी पाली पोलीस स्थानकाची परवानगी घेण्यात आली नव्हती.