सुतारवाडी नाक्यावर माकडाचा हैदोस, चार जणांना चावला अन्…

राजू दळवी यांनी जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांना त्वरित दूरध्वनीद्वारे कळविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे हा भलामोठा माकड असाच मोकाट राहिला तर आणखी किती जणांना त्रास देईल हे सांगता येत नाही. दरवर्षी हा मोठा माकड या परिसरात येतो.

    सुतारवाडी : सुतारवाडी नाक्यावर भल्यामोठ्या माकडाने हैदोस माजविले असून दिनांक २०  मार्च २०२१ रोजी चार जणांना चावल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याबाबत राजू दळवी यांनी जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांना त्वरित दूरध्वनीद्वारे कळविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे हा भलामोठा माकड असाच मोकाट राहिला तर आणखी किती जणांना त्रास देईल हे सांगता येत नाही. दरवर्षी हा मोठा माकड या परिसरात येतो.

    गेल्या वर्षी सुतारवाडी नाक्यावर असेच त्याचे आगमन झाले होते. घर उघडी असतील तर घरातील फ्रीज उघडून त्यातील सामानाची नासधूस करून फळे असतील तर ती घेऊन बाहेर येतो. घराच्या छपरावर तासनतास बसून राहतो. कोलाड, वाळंजवाडी, ढोकळेवाडी मार्गे हा माकड सुतारवाडीकडे येतो. गेल्या चार वर्षापासून हा माकड या परिसरात सातत्याने येत आहे. मात्र त्याने कोणाला त्रास दिला नाही. त्यामुळे नागरिक त्याला आवडीने खायचे द्यायचे. मात्र या वर्षी त्यांने नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली असून वन खात्याने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

    कारण सुतारवाडी नाक्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यात लहान मुले नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. वनखाते जर दखल घेत नसतील तर आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातील डोंगरावर वनवे अनेक वेळा लागलेले आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर वनवे लागतात. त्यामुळे वन नष्ट झाल्यामुळे अनेक शाकाहारी मांसाहारी प्राणी जंगल सोडून अन्नाच्या शोधार्थ गावात येत आहेत. मात्र जंगल खाते कोणतेही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.