पंडित नेहरूंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चिपळुणात काँग्रेस आक्रमक, तत्काळ अटक करण्याची मागणी

सुनील बक्षी या व्यक्तीने पंडित नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून ते सार्वजनिक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून जिल्हाभरातून प्रचंड संताप उफाळत आहे. सुनील बक्षी या माथेफिरूवर आपण तातडीने कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे अशा महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आपल्याकडून तातडीने कारवाई न झाल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. तरी सुनील बक्षी याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

    चिपळूण : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशभर बालदिन म्हणून साजरा होत असताना, सुनील बक्षी नामक एका व्यक्तीने नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीसांकडे केली. यासंदर्भात काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. संयमाची हद्द आता संपली आहे, यापुढे कोणाचीही गय करणार नाही. वेळप्रसंगी सडेतोड उत्तर देऊ, असा इशाराही या वेळी यादव यांनी दिला.

    चिपळूणचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना आज सकाळी यासंदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    काँग्रेसतर्फे यादव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबरला देशभर बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले उभे आयुष्य देणाऱ्या नेत्यांपैकीच पंडित नेहरू एक होते. अबालवृद्धांपासून सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे.

    मात्र, सुनील बक्षी या व्यक्तीने पंडित नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून ते सार्वजनिक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून जिल्हाभरातून प्रचंड संताप उफाळत आहे. सुनील बक्षी या माथेफिरूवर आपण तातडीने कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे अशा महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्याचे धाडस कोणी करणार नाही.

    आपल्याकडून तातडीने कारवाई न झाल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. तरी सुनील बक्षी याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीसोबत सुनील बक्षी याने केलेली पोस्ट, लिंक आणि त्याच्या फेसबुक अकाऊंटची माहितीही काँग्रेसतर्फे पोलिसांना देण्यात आली.