
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Police Notice To Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) नोटीस बजावली आहे.
सिंधुदुर्गः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Police Notice To Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये ३ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची (Nitesh Rane) माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र हे दोघेही पिता -पुत्र सध्या बेपत्ता असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
दरम्यान नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी दोघेही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.