‘विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे आणू नये’ विमानतळाच्या उद्घाटनात राणे आणि ठाकरेंची ‘डबलबारी’

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाले. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला.

    सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाले. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला.

    नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

    उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले. तसेचं स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? मला आजच कळलं विमानतळाचा मालक कोण? वीरेंद्र म्हस्कर गेले आणि दुसरे आले. स्टेजवर आलो आणि विनायक राऊतांनी सांगितल, म्हटलं कार्यक्रम कुणाचा, एमआयडीसीचा आहे, म्हस्कर साहेबांचा आहे, काय चाललंय? काय प्रोटोकॉल आहे की नाही? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. पण प्रोटोकॉल जरुर पाळा. जनता तुम्हाला सन्मान देईलच, असं त्यांनी सांगितलं.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

    मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले.