केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री कोनशिलाच्या अनावरणावेळी समोरासमोर; ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. उद्धव ठाकरेंनी राणेंंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

    सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते.

    दरम्यान यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

    उद्धव ठाकरेंनी नमस्कार केला नाही आणि राणेंनीही केला नाही

    दुपारी साडेबाराच्या आसपास राणे आणि मुख्यमंत्र्यांचं विमान चिपीवर लँड झालं. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले. नंतर काही वेळातच राणे कोनशिलेजवळ आले. तिथे उद्धव ठाकरे-राणे एकमेकांना नमस्कार करुन कमीत कमी स्मितहास्य करतील, अशी शक्यता होती. परंतु उद्धव ठाकरेंनी नमस्कार केला नाही आणि राणेंनीही केला नाही. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आले आहेत.

    राणेंचं आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही.

    कोनशिलेचे अनावरण

    कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित होते.