सिंधुर्गाच्या चार नगरपंचायतींसाठी आज मतदान, राणे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे तर शिवसेनेचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक निवडणूक प्रचार रणांगणात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी ३ नगरपंचायत राणेंकडे आहेत तर एक शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळी चारही नगरपंचायत भाजप जिकेल असा विश्वास नारायण राणेंना आहे.

    सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीच्या १३ प्रभागांसाठी आज मतदान होत असून ४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. ९ हजार १७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी निवडणूक विभागाकडून सर्व तयारी पूर्ण झाली झाली आहे.
    मतदान प्रक्रियेसाठी १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून ६५ कर्मचारी, १३ पोलीस कर्मचारी व १० राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत, तर शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष आघाडी करून निवडणूक लढवित आहेत. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. जिल्ह्यातील होत असलेल्या नगरपंचायतीच्या मतदानावर सकाळच्या सत्रात परिणाम झाला आहे. त्यामुळे मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पहिल्या दोन तासातील सरासरी ७.३० ते ९.३० पर्यंत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत १६.८४ टक्के, कुडाळ नगरपंचायतीत १३.५१ टक्के, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत १५ टक्के, देवगड-जामसंडे नगरपंचायतीत ८ टक्के मतदान झाले आहे.
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे तर शिवसेनेचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक निवडणूक प्रचार रणांगणात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी ३ नगरपंचायत राणेंकडे आहेत तर एक शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळी चारही नगरपंचायत भाजप जिकेल असा विश्वास नारायण राणेंना आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनेही कंबर कसली असून चारही नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्याच्या मनसुभ्याने आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
    त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालांकडे जिल्हावासीयांचे डोळे लागले आहेत.