आजीचं सोनं वाचवणाऱ्या १२ वर्षांच्या मुलीच्या शौर्याची कमाल, काळे चव्हाण गँगच्या सराईत चोरट्याला पकडून पोलिसांच्या केलं हवाली

वटपौर्णिमेच्या दिवशी वैशाली पाटणे या आपली नात शुभ्रा सोबत कॅम्प नंबर ४ भागात व्हिनस चौक परिसरात सफरचंद खरेदीसाठी आल्या होत्या. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत होती.

    उल्हासनगर : उल्हासनगर(Ulhasnagar) शहरात सध्या १२ वर्षांच्या चिमुरडीच्या धाडसाचं कौतुक होत आहे. या चिमुरडीने आपल्या आजीचं ४ तोळं सोने घेऊन पळवून नेणाऱ्या काळे चव्हाण गँगच्या(Kale Chavhan Gang) एका सराईत चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली(Arrest) केलं आहे.

    वटपौर्णिमेच्या दिवशी वैशाली पाटणे या आपली नात शुभ्रा सोबत कॅम्प नंबर ४ भागात व्हिनस चौक परिसरात सफरचंद खरेदीसाठी आल्या होत्या. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत होती. संधी साधत त्याने या दोघींना अडवलं आणि आमच्या शेठला मुलगा झाल्याने तो साडी, चप्पल आणि पैसे वाटत असल्याची बतावणी केली. तो त्यांना एका गल्लीत घेऊन गेला. दरम्यान वयोवृद्ध वैशाली यांच्या अंगावरील तीन तोळ्याचे गंठण आणि एक तोळ्यांच्या अंगठी होती, ते काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. यावेळी संधी साधत त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराने आजीच्या हातातील पिशवी हिसकावली आणि पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १२ वर्षाच्या शुभ्राने चोरट्यांचा पाठलाग केला. पळ काढण्यासाठी रिक्षात बसलेल्या त्या चोरट्यांना बाहेर खेचले. इतरांच्या मदतीने तिने आरोपींना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले.एक साथीदार मात्र पळून गेला.

    दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी गोविंद काळे याला अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीवर महाराष्ट्राच्या विविध भागात ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले. तसेच ही काळे चव्हाण टोळीतील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान शुभ्राच्या या धाडसाचं उल्हासनगर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.