खर्डीत रान वणव्यात ३ घरे जळून खाक; वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

या घटनेत पंडित मधुकर पांढरे, कार्तिक कुलबहादूर आणि भुऱ्या पालू हिलम यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून अन्नधान्य साठा आणि कपडे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

    कसारा : शहापूर तालुक्यात आगीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटल्याने या आगीत तीन घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

    खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा वस्तीजवळ बुधवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक वणवा लागल्याने ३ कुडाची घरे जळून खाक झाली. हवेमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी तीन घरे आल्याने जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच खर्डी मंडल अधिकारी संदीप चौधरी,खर्डी ग्रामपंचायत सरपंच भाग्यश्री डिगे, उपसरपंच प्रणाली खर्डीकर, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, पत्रकार प्रकाश जाधव, तलाठी विजय लोहकरे, चंद्रकांत मोंडुळा, कोतवाल राजेश जाधव, दीपक पराड, यशवंत केवारी, रवी डिगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

    मात्र या घटनेत पंडित मधुकर पांढरे, कार्तिक कुलबहादूर आणि भुऱ्या पालू हिलम यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून अन्नधान्य साठा आणि कपडे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान खर्डी गावातील उपसरपंच यांनी पुढाकार घेत लागलीच इतर लोकांच्या मदतीने पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीसह,भांडी,कपडे,भाजीपाला आणि किरणासामान देऊन मदतीचा हात पुढे केला. सदर घटनास्थळाचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.