ambernath company

अंबरनाथ (ambernath)पश्चिमेच्या एका केमिकल कंपनीत(chemical company) टाकी साफ करताना गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू(3 labor died in chemical factory tank) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    अंबरनाथ: अंबरनाथ (ambernath)पश्चिमेच्या एका केमिकल कंपनीत(chemical company) टाकी साफ करताना गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू(3 labor died in chemical factory tank) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या कंपनीत रासायनिक भूमिगत टाकीत सकाळच्या सुमारास साफसफाईसाठी हे ३ कामगार उतरले होते, त्यावेळी टाकीतून अचानक गॅस गळती सुरु झाली. त्यामुळे या कामगारांचा श्वास गुदमरला. त्यांना टाकीच्या बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.धक्कादायक बाब म्हणजे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवण्यात आली नव्हती. शिवाय एवढी मोठी दुर्घटना घडली असताना कंपनी प्रशासन आणि काम करणाऱ्या ठेकेदारापैकी कोणतीही जबाबदार व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती.

    अंबरनाथ पश्चिम भागात इंडस्ट्रियल ईस्टर केमिकल कंपनी आहे. या कंपनीत क्रूड ऑइलच्या तीन भूमिगत टाक्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून या टाक्यांची सफाई करण्यात आली नव्हती.महत्वाचे म्हणजे या कंपनीत असलेल्या मोठ्या टाक्यांना रंग लावण्याचे काम हे कामगार करत असताना अचानक आज सकाळी त्यांना या भूमिगत टाक्यांची सफाई करण्यास सांगण्यात आले. मात्र याकरिता त्यांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवण्यात आली नव्हती.आज सकाळी साडे आठच्या सुमारास पाच कामगार ही टाकी साफ करण्यासाठी उतरले असताना तिथे वायू गळती झाली. त्यावेळी कामगारांना त्याचा त्रास झाला.त्यातील दोन कामगार टाकीतून बाहेर पडले. मात्र तिघांना गॅसची जास्त बाधा झाल्याने त्यांना टाकीच्या बाहेर पडणे शक्य झाले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    दिनेश सहानी,बिंदेश सहानी आणि हर्षद इस्तर असे मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे.कंपनीत ही दुर्घटना सकाळी साडेआठ वाजता घडली. मात्र इतर कामगार ३तास या मृत कामगारांना टाकीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत होते.त्यांना त्यात यश आले नाही.अखेर ३ तासानंतर कंपनी प्रशासने अग्निशमन दलाला याची माहिती दिली.त्यानंतर अग्निशमन दलाने दोरीच्या मदतीने ३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.

    अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून कामगारांचे मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.या सगळ्या प्रकरणात ठेकेदार आणि कंपनी प्रशासनाचा प्रथमदर्शनी निष्काळजीपणा दिसत असून कायदेशीर कारवाई करणार आहोत.शिवाय टाकीत कोणते क्रूड ऑइल होते याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले आहे.काम सुरू असताना ठेकेदार मात्र जागेवर नव्हता.

    या कंपनीत टाक्यांचा रंग आणि साफ सफाई करण्यासाठी एका ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता.मात्र त्याने कामगारांना हे काम करत असतांना सुरक्षेची कोणतेही साधने पुरवली नव्हती.ती पुरवली असती तर ही दुर्घटना झाली नसती असे इतर कामगारांचे म्हणणे आहे.इतकच काय तर काम सुरू असतांना ठेकेदार कंपनीत उपस्थित देखील नव्हता.हे ठेकेदार परराज्यातील कामगारांना कमी पगारात राबवून घेत आपला आर्थिक फायदा बघतात, त्यामुळे वारंवार अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे . कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारी ही ठेकेदार आणि कंपनी प्रशासनाची असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.