ठाणे महापालिकेत स्थायी समितीकडून ३ हजार २४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर; मुळ अंदाजपत्रकात ४९१ कोटींची वाढ

कोरोनामुळे अर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ठाणे मनपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी,२०२१-२२ या वर्षीचा काटकसरीचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला होता. त्यात जमेची बाजु गृहित धरून ४९१ कोटींची वाढ करून ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांच्या रकमेस स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेसमोर सादर केला.

    ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या २ हजार ७५५ कोटी ३२ लाखांच्या काटकसरीच्या अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ करत ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांचा सुधारीत अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सर्वसाधारण सभेसमोर मांडला. यात विकास आराखड्यातील रस्ते निर्मिती,कॉंक्रीटीकरण आणि नुतनीकरण आदींसह अनेक जुन्याच प्रकल्पांसाठी वाढीव संकल्पाची तजवीज केल्याची दिसुन येत आहे. विशेष म्हणजे,१३१ नगरसेवक असलेल्या ठाणे शहराला न्याय देण्याऐवजी स्थायी समितीतील सहकाऱ्यांनी आपापल्या प्रभागांचा विचार केल्याचे दिसत आहे.

    दरम्यांन काही ठराविक प्रभागात जास्त निधी दिला असल्याची चर्चा दबक्या आवाजात पालिकेच्या वर्तुळात ऐकायला मिळाली. कोरोनामुळे अर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ठाणे मनपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी,२०२१-२२ या वर्षीचा काटकसरीचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला होता. त्यात जमेची बाजु गृहित धरून ४९१ कोटींची वाढ करून ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांच्या रकमेस स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेसमोर सादर केला. यात,रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी वाढीव तरतुद केली आहे. यात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी ३४ कोटी १० लाख, युटीडब्ल्यूटी रस्ते नुतनीकरणासाठी २९ कोटी ४० लाख, विकास आराखड्यातील रस्ते बांधणीसाठी १३८ कोटी,नाले बांधणीसाठी १६ कोटी ६५ लाख,मलवाहिन्यांसाठी २१ कोटी,अमृत योजनेसाठी २० कोटी असे सुमारे २४० कोटीची वाढीव तरतुद रस्ते सुधारणा या नेहमीच्याच कामांसाठी केल्याचे दिसून येत आहे.

    याशिवाय दवाखाने,रुग्णालयांसाठी ३१ कोटी व तलाव सुशोभिकरणासाठी २२४ कोटी आणि विविध रखडलेल्या प्रकल्पांसाठीही निधीची तरतुद केली आहे. तर,सदस्यांना आपापल्या प्रभागातील तातडीची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रती सदस्य २८ लक्ष ८२ हजार इतका स्वेच्छा निधी ठेवण्यात आला आहे.