प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात धडक मोहीम राबवणार, आयुक्तांचे निर्देश

प्लास्टिकबंदी (plastic banned) हा स्वच्छतेमधील अत्यावश्यक घटक असून या आठवड्यात सर्व विभागांमध्ये प्लास्टिकबंदीच्या धडक मोहीमा राबवाव्यात असे आयुक्तांनी आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत दिले. दैनिक नवराष्ट्रने नवी मुंबईत(New Mumbai)  प्लॅस्टिक बंदीचा फज्जा असे वृत्त प्रसारित करून पालिकेचे या करवाईकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात आणून दिले होते.

नवी मुंबई : शहरात ठिकठिकाणी स्वच्छता संदेशासह चित्रमय भिंती तसेच सुशोभिकरणाची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे. तरी सुशोभिकरणाला खरी शोभा स्वच्छतेमुळे येत असल्याने शहर स्वच्छतेकडे जराही कुचराई न करता अत्यंत काटेकोरपणे लक्ष द्यावे. तसेच प्लास्टिकबंदी (plastic banned) हा स्वच्छतेमधील अत्यावश्यक घटक असून या आठवड्यात सर्व विभागांमध्ये प्लास्टिकबंदीच्या धडक मोहीमा राबवाव्यात असे आयुक्तांनी आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत दिले. दैनिक नवराष्ट्रने नवी मुंबईत(New Mumbai)  प्लॅस्टिक बंदीचा फज्जा असे वृत्त प्रसारित करून पालिकेचे या करवाईकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात आणून दिले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्तांनी कारवाई कठोर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये “निश्चय केला – नंबर पहिला” हे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.त्यासाठी आयुक्तांनी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे तसेच सर्व नोडल अधिकारी विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आयुक्तांनी ५० किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांना त्यांच्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी यासाठी सोसायट्यांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देण्याचे निर्देश दिले. सुशोभिकरणासोबत ‘रस्त्यावर शून्य कचरा तत्वानुसार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर कचरा पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लॅस्टिक बंदी असल्याने कठोर कारवाई करून जागृती करावी, सायन पनवेल महामार्ग या शहरातील मुख्य रस्त्याची संपूर्ण स्वच्छता व सुशोभिकरण कामे या आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उघड्यावर शौच अथवा मूत्रविसर्जन होणा-या जागांकडे सतर्क राहून विशेष लक्ष द्यावे. दुकानदारांप्रमाणेच फेरीवाल्यांनीही आपल्याकडे कच-याचे डबे ठेवणे बंधनकारक करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. रस्त्यावर पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ दिसते हे लक्षात घेऊन याला प्रतिबंध करण्यासाठी कडक कारवाई करावी.हवा गुणवत्ता मापन केंद्रे त्वरीत सुरु करावीत. प्रदुषण कमी करण्यासाठी नागरिकांनी सायकलीचा जास्तीत जास्त वापर करावा यादृष्टीने जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याचे आदेश दिले.

हा आहे आमचा स्वच्छता निरीक्षक

स्थानिक पातळीवर नागरिकांशी प्रत्यक्ष संबंध येणा-या स्वच्छता निरीक्षक यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क यावा याकरिता महानगरपालिकेच्या वतीने सर्व विभागात राबविल्या जात असलेल्या “हा आहे आमचा स्वच्छता निरीक्षक’ हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले.

१ लाखांहून अधिक झाडे लावणार

माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण संरक्षण, संवर्धन उपक्रमांवरही भर द्यावा. या अभियानांतर्गत १ लाखाहून अधिक वृक्षारोपणाचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सुयोग्य नियोजन केले जात असून वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही तितक्याच काळजीने पार पाडावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. वृक्षारोपण करताना भारतीय प्रजातीची देशी झाडे लावावीत यावर कटाक्षाने लक्ष देण्याचे त्यांनी सूचित केले. वृक्षारोपणाप्रमाणेच हरीतपट्टे निर्मितीवरही भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नवी मुंबई हे सुशिक्षित नागरिकांचे शहर म्हणून नावाजले जाते. त्यामुळे 'स्वच्छ सर्वेक्षण' असो की 'माझी वसुंधरा अभियान' यामध्ये नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय संपूर्ण यश मिळणे शक्य नाही. नवी मुंबईकर नागरिकांनी नेहमीच शहराविषयीचे आपले प्रेम विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन व्यक्त केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहभाग वाढीवर भर देण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करावेत.

अभिजित बांगर आयुक्त, नवी मुंबई महापालिका