नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

  नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज २४ जून सिडकोला घेराव घातला. मोठ्या संख्येने आंदोलक आणि भूमिपुत्र सिडको ऑफिस परिसरात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे पोलीस, CRPF आणि दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी सज्ज होते, पण आंदोलकांनी शांतपणे आंदोलन केल्याने सुव्यवस्था टिकून राहिली. नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली अशी विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर झाले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना, विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे, असे निवेदन देण्यात आले.

  नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

  नवी मुंबईला छावणीचं स्वरुप

  आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

  प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात

  मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास ५०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस काल संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

  वाहतुकीत अनेक बदल

  आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

  यानुसार आज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ असा १२ तास कळंबोली ते बेलापूर आणि वाशी ते बेलापूर रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय हलक्या वाहनाच्या वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला आहे.

  तसेच कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

  सिडकोला घेराव घालणार

  गेल्या १० जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’ ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घातला जाणार आहे.

  दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी आज (२४ जूनला) सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणांची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. दुसरीकडे महिलाही मागे राहिल्या नाहीत.  योगायोगाने आजच वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे.

  या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करु, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे, अशीही माहिती कृती समितीने दिली आहे.