वसुलीभाई गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात भाजपची निदर्शने; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केली घोषणाबाजी

ठाण्यातही भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप ओबीसी सेलच्या नेतृत्वाखाली ठाणे जिहाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, निदर्शकांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना व काँग्रेसचाही उद्धार केला.

    ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी वसुलीभाई गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकिय वातावरण चांगलच तापलं आहे. नैतिकता म्हणुन गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटून रविवारी ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यानी निदर्शने केली.

    ठाण्यातही भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप ओबीसी सेलच्या नेतृत्वाखाली ठाणे जिहाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, निदर्शकांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना व काँग्रेसचाही उद्धार केला.

     

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुली करून देण्याचे आदेश दिल्याच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे गृहखाते बदनाम झाले आहे. तेव्हा,गृहमंत्र्यानी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यानी निदर्शने केली. यावेळी अनिल देशमुख हाय हाय,शरद पवार हाय हाय,एकनाथ शिंदे हाय…हाय यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच,कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असे निषेधाचे काळे फलकही झळकवण्यात आले.

    ठाणे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे व आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे अध्यक्ष सारंग मेढेकर,ओबीसी सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, भाजप पदाधिकारी विक्रम भोईर आदींसह भाजपच्या महिला कार्यकर्त्याही मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.