धारदार शस्त्र व हाताच्या ठोश्याबुक्क्यांनी दोघांना मारहाण ; ५ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी :  वर्षभरापूर्वी मोबाईल चोरी करताना रंगेहात पकडल्याने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी आपसात संगनमत करून दोघा मित्रांना शिवीगाळ करून धारदार शस्त्राने वार व हाताच्या ठोश्याबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी चरणीपाडा येथील अंगणवाडीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली आहे.या मारहाणप्रकरणी पाच जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास आनंदा भोये, विशाल आनंदा भोये, रोशन बाबू कुरे, सूरज बाबू कुरे, निलेश बाबू कुरे अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नांवे आहेत.तर गोपी मुन्ना गिरी आणि विजय कांबळे अशी जखमींची नावे आहेत. या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.आर.पाटील करीत आहेत.