
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील (NMMC School) इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांकरिता मोफत उपलब्ध (Byjus App Free For 3 Years) करून देण्यात येत आहे.
नवी मुंबई : लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड व स्माईल्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील (NMMC School) इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांकरिता मोफत उपलब्ध (Byjus App Free For 3 Years) करून देण्यात येत आहे. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित बायजू शैक्षणिक ॲपच्या शिक्षक प्रशिक्षणाप्रसंगी झालेल्या करार वितरण कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर(Abhijit Bangar) आपले मनोगत व्यक्त करीत होते. आयुक्त अभिजीत बांगर यांनी लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड आणि स्माईल्स फाऊंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांच्या कालावधीकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
लायन्स क्लब व स्माईल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बायजू शैक्षणिक ॲपसारख्या महत्वपूर्ण सुविधेची भर घातली जात आहे. यामधून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीचा नवा मार्ग खुला होत असल्याचा आनंद वाटतो. बायजू शैक्षणिक ॲपची प्रणाली राबविण्यासाठी महानगरपालिका शिक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याला होईल याची काळजी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी घ्यावी.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांच्या गुणांमध्ये वृद्धी व्हावी यादृष्टीने दृकश्राव्य माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारे बायजू शैक्षणिक ॲप अत्यंत उपयोगी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांतील आठवी ते दहावीच्या ९६३२ विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून दिले जात आहे. एकूण ४० हजार विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून देण्याचा करार झाला असून याव्दारे शालेय अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या संकल्पनांची स्पष्टता होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय विकसित होऊन सोप्या पध्दतीने विषय आकलन होऊन अभ्यासाची आवड निर्माण होणार आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदिप पवार, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एल.जे.टावरी, सचिव सुधाराणी जैन, अध्यक्ष अनुराधा जैन, सदस्य वैशाली साळवी व आशा पटेल तसेच स्माई्ल्स फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक धीरज आहुजा, अध्यक्षा उमा आहुजा, सचिव शालिनी विधानी, सदस्य अरूणा आनंद व शेफाली नायर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करीत असून नवी मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना साधारणत: १४.५० कोटी रक्कमेचे बायजू शैक्षणिक ॲप उपलब्ध करून देण्याची संधी आम्हांला मिळाली याबद्दल लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एल.जे.टावरी यांनी समाधान व्यक्त केले.