
आजमितीस संपूर्ण देशात १ कोटी ६० लाख असंघटित कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याची माहीती केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav In Navi Mumbai)यांनी नवी मुंबईत बोलताना दिली. माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाशी माथाडी भवन(Mathadi Bhavan Program) येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
नवी मुंबई : देशभरात ४०० प्रकारचे असंघटित कामगार काम करत आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षितता लाभणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ई श्रम पोर्टल(E Shram) सुरू केले असून त्याद्वारे आम्ही असंघटित कामगारांना श्रम कार्ड(Shram Card) वाटत आहोत. आजमितीस संपूर्ण देशात १ कोटी ६० लाख असंघटित कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याची माहीती केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav In Navi Mumbai)यांनी नवी मुंबईत बोलताना दिली. माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाशी माथाडी भवन(Mathadi Bhavan Program) येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
On the 88th birth anniversary of Mathadi workers’ leader Annasaheb Patil, participated in the Kamgar Mathadi Melawa along with senior BJP leader Shri @Dev_Fadnavis. Highlighted how Annasaheb was a visionary who worked for a social organisation for workers and rural development. pic.twitter.com/gnzd0PwLNY
— Bhupender Yadav (@byadavbjp) September 25, 2021
यावेळी मंत्री यादव यांनी माथाडी कामगारांनी देखील आपली नोंदणी ई श्रम पोर्टलवर करावी असे आवाहन केले. देशातील असंघटित कामगारांचा डेटा बेस बनवण्यासाठी सुरुवात केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कामगारांसाठी ओक्युपेशन कायदा, वेतन कायदा आणला. यावेळी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्या मागणीनुसार मंत्री यादव यांनी माथाडींच्या शिष्टमंडळास दिल्लीत बैठकीचे आश्वासन दिले. इन्कम टॅक्समधील न मिळणारी सूट व इतर प्रश्न देखील सोडवले जातील असे अश्वासन देण्यात आले.
यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माथाडी चळवळ ही केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना नवीन नाही. ते याआधी राज्यात प्रभारी होते. माथाडी चळवळीचे महत्व हे मला माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी समजावून सांगितले. बोजा उचलणाऱ्या कामगाराला माथाडी चळवळीने सन्मान मिळवून दिला आहे. मोदींच्या काळात देशात २७ कायदे होते. इंग्रज काळातील काही कायदे कामगारांसाठी फार जाचक होते. यात माजदूरला वाईट वागणूक मिळत होती. या २७ कायद्याचे एकत्रितकरण करून त्यात सुसूत्रता आणल्याने कामगारांना फायदा मिळू लागला आहे.
इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्यासाठी केंद्राच्या पोर्टलमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी माथाडी चळवळीला आयुष्यभर पाठिंबा राहील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून सातय्याने बाजार समितीत राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेचे कौतुक केले.
यावेळी आ. मंदा म्हात्रे, आ. प्रसाद लाड, आ. निरंजन डावखरे, माजी मंत्री राज पुरोहित, एपीएमसी संचालक समितीचे सभापती अशोक डक, शंकर पिंगळे, संजय पानसरे, संजय उपाध्याय, माजी खा. संजीव नाईक, माजी आ. संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, रामचंद्र घरत, माजी नगरसेविका भारती पाटील, हनुमंत पाटील, चंद्रकांत पाटील, शुभांगी पाटील, ऋषिकांत शिंदे उपस्थित होते.
राज्यातील विविध जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी लसीकरण
माथाडी नेते नरेंद पाटील यांच्या मागणीनुसार फडणवीस यांनी पाटील यांना आश्वस्त करताना दानशूर फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांतील माथाडींसाठी लसीकरण मोहीम राबवू असे आश्वासन दिले.
फडणवीसांचे अजूनही ‘मी पुन्हा येईन’
आमच्या सरकारच्या काळात माथाडी कामगारांचे १०० टक्के प्रश्न सुटले नसतील. मात्र मी मुख्यमंत्री असता मुख्यमंत्री पदाच्या काळात सरकारचे दरवाजे उघडे होते. शशिकांत शिंदे असोत वा नरेंद्र पाटील त्यांनी त्यांनी कधीही प्रश्न मांडावा आम्ही तो सोडवला किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला. आणखी संधी मिळाली असती तर आम्ही ते नक्कीच सोडवले असते. या सरकारला देखील माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे. जर त्यांनी नाही सोडवले तर आम्हाला पुन्हा संधी मिळाल्यावर सोडवू असे म्हणत फडणवीसांकडून ‘मी पुन्हा येईन’या वाक्याची झलक पाहण्यास मिळाली. यावेळी आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे यांची देखील भाषणे झाली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनुपस्थितीवर नरेंद्र पाटलांची नाराजी
अण्णासाहेब जयंती निमित्त आयोजित मेळाव्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र मविआचे नेते अनुपस्थित राहिल्याने माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यावेळी आम्ही आमच्या मागण्या करूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा आवाज पोहोचत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे तब्येतीला सांभाळतात तर अजित पवार गर्दीला सांभाळतात तर दुसरीकडे आमचे देवेंद्र फडणवीस न चुकता माथाडींसाठी उपस्थित राहतात अशी तुलना करत पाटील यांनी मविआच्या नेत्यांना टोला लगावला.
बांगलादेशी कामगार एपीएमसीत ?
यावेळी नरेंद्र पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी करताना बांगलादेशी नागरिकांची बाजू घेतली. बांगलादेशी कामगार देखील एपीएमसीत कामे करत असल्याने त्यांनाही कामगार कायद्याचे संरक्षण मिळावे, अशी धक्कादायक मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. एकीकडे भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी कामगारांवर शासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. त्यांना पकडून परत पाठवले जाते अशात पाटील यांनी थेट त्यांच्या संरक्षणाची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अण्णासाहेबांचा सन्मान देशभरात होणे आवश्यक
कै.अण्णासाहेब पाटील हे अष्टपैलू व दूरदृष्टी नेतृत्व होते. जमिनीशी नाळ जोडलेल्या सामान्य माणसाने अनन्यसाधारण कर्तृत्व दाखवत माथाडी कामगार चळवळ उभी केली. असंघटीत कामगारांना संघटित केले. सरकारवर दबाव आणत विविध योजना कामगारांसाठी आणणे भाग पाडले. त्यांच्यामुळे लाखो माथाडी कामगारांना न्याय मिळाला, सुरक्षितता मिळाली. अशा कै. अण्णासाहेबांचा सन्मान हा संपूर्ण देशभरात होणे गरजेचे असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी काढले.