प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' अशी टीमकी वाजवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात उद्घाटन केलेले ठाण्यातील बोरीवडे येथील कोविड हेल्थ सेंटर दोनच महिन्यात बंद झाल्याचे दिसुन आले आहे. एमएमआरडीए, झी समुह आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या या रुग्णालयापायी दोन महिन्यातच दोन कोटींना फटका बसला आहे.

    ठाणे (Thane).  कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ अशी टीमकी वाजवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात उद्घाटन केलेले ठाण्यातील बोरीवडे येथील कोविड हेल्थ सेंटर दोनच महिन्यात बंद झाल्याचे दिसुन आले आहे. एमएमआरडीए, झी समुह आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या या रुग्णालयापायी दोन महिन्यातच दोन कोटींना फटका बसला आहे.

    यात ठाणेकर करदात्यांचे ६७ लाखदेखील नाहक वाया गेल्याने भाजपचे स्थायी समिती सदस्य भरत चव्हाण यांनी मंगळवारच्या बैठकीत याचा जाब विचारला.त्यावर,मनपा अधिकारी व सभापतींनी सारवासारव करीत वेळ मारून नेली.विशेष म्हणजे या रुग्णालयात एकाही रुग्णावर उपचार झाले नसल्याचे समोर आले आहे.

    ठाणे महापालिका क्षेत्रातील तसेच परिसरातील कोरोना बाधितांना तातडीने औषधोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून घोडबंदर परिसरातील बोरिवडे येथील मैदानात एमएमआरडिए, ठाणे महापालिका आणि झी इंटरटेन्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या कोव्हीड हेल्थ सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले होते.या रुग्णालयासाठी एमएमआरडिएने १ कोटी २४ लाख,महापालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी ६७ लाखांचा खर्च आणि झी द्वारे काही लाखांचे तंबु उभारून दिले होते.मात्र काही महिन्यांतच हे रुग्णालय बंद झाल्याने तब्बल दोन कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे.

    महापालिकेचे जवळपास ७० लाख वाया गेल्याचा मुद्दा नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित करून प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेची कोंडी केली.नगर अभियंता रविंद्र खडताळे आणि अभियंता मोहन कलाल यांनी,करारनामा संपला, पालिकेकडे भाडे मागितले….अशी सारवासारव करून गरज भासल्यास रुग्णालय पुन्हा सुरू करू.असे सांगितले. त्यावर भरत चव्हाण यांनी आक्षेप नोंदवत ७० लाखांचा चुराडा का केला ? असा प्रतिप्रश्न केला.तर,स्थायी सभापती संजय भोईर यांनी संबधितांनी भाडे मागितल्याने हे रुग्णालय बंद केल्याचा दावा करून वेळ मारून नेली.दरम्यान,या रुग्णालयासाठी खर्च झालेली रक्कम ठाणेकर करदात्यांच्या खिश्यातून गेल्याने त्याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.