eknath shinde and jitendra awhad

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या (Kharegaon Flyover Inauguration) कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shivsena Vs Rashtrawadi) या दोन्ही मित्र पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. मात्र हा वाद आज उघडपणे समोर आला आहे.

  ठाणे : कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचं (Kharegaon Flyover) आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात एकाच मंचावरुन महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड (Eknath Shinde Vs Jitendra Awhad) यांची एकमेकांच्या पक्षाबद्दल केलेली वक्तव्य चर्चेचा विषय बनली आहेत. खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या (Kharegaon Flyover Inauguration) कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. मात्र हा वाद आज उघडपणे समोर आला आहे.

  जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २००९ साली आमदार झालो. मात्र, विकासकामांसाठी कधी निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. २००९ नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेली विकास कामे यातील फरक दिसून येईल. भास्कर नगर मधील रस्त्यासाठी विधानसभेत मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगितले. २० वर्षानंतर हा रस्ता झाला. महापौरांनी मिशन कळवा, असे म्हटले मात्र, त्यांचे मिशन कळवा काय हे समजलं नाही. जयवंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करतील, अशी सूचना केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या.

  यावेळी महाविकास आघाडीचे पोस्टर लावले असते तर आम्हाला परत पोस्टर लावावे लागले नसते. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

  एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारणा पलीकडची आहे, त्यात एक अबोलपणा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे तुम्ही कधी याबाबत विचारा, असं आव्हाड म्हणाले. तसेच एकत्रित येऊन काम करूया, असंही त्यांनी सांगितलं.मनपावर शिवसेनेची सत्ता आहे. निधी त्यांनी दिलाय हे सर्वांना माहिती आहे. मी शिंदे साहेबांबद्दल काही बोललो तर लोकांना आश्चर्य वाटेल, आमची मैत्री जुनी आहे. आमच्या मैत्री बद्दल कोणाला काहीच माहिती नाहि. शिंदे साहेब आपण जे नातं ठेवलंय ते आपल्या लोकांना जपायला सांगा, असा इशाराही आव्हाडांनी दिला.

  निवडणुकीत महाविकास आघाडी होणार हे पहिल्या दिवसापासून बोलतोय, मी कधीही वागळे मिशनबद्दल बोललो नाही. आपला शत्रू कोण आहे, याचा विचार करून आपण एकत्र येऊया. ठाण्यात रस्त्यांवर खड्डे दिसतील पण, कळव्यात खड्डे दिसणार नाहीत. तुम्ही निधी देता पण, कामावरही लक्ष ठेवावे लागते, असंही आव्हाड म्हणाले.

  एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमची मैत्री आहे हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओठात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अढी ठेवत नाही.”

  “वागळे मिशन करायला कधी रोखणार नाही. कळवा मिशन म्हणजे महाविकास आघाडीचे जास्त नगरसेवक निवडून आणणे आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जनतेची कामे करूया. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी कमिशनचे राजकारण केले नाही. तसेच आयुक्तांना कधी फोन करून सांगितले नाही की ही माझी फाईल आहे. वेळप्रसंगी आम्ही एकमेकांना नडलो पण कमरेखाली वार केले नाही. ते आमच्या रक्तात नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.